म्हाडाच्या भाडेकरू आणि रहिवाशांना थकीत भाड्यावरच्या व्याजात ४० टक्क्याची सुट

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : म्हाडाच्या संक्रमण शिबिरातल्या भाडेकरू आणि रहिवाशांना, अभय योजनेअंतर्गत थकीत भाड्यावरच्या व्याजात ४० टक्क्याची सुट दिली जाणार आहे. जे रहिवाशी संपूर्ण थकित भाडे भरतील त्यांनाच हा लाभ दिला जाणार आहे.

कोरोना प्रादुर्भावामुळे सर्वसामान्यांना निर्माण झालेल्या आर्थिक समस्या लक्षात घेऊन, याआधीही दोन टप्प्यात अभय योजना राबवली गेली होती. तिला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर, मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाने या योजनेचा तिसरा टप्पा जाहीर केला आहे.

येत्या १ मे पासून ३१ जुलैपर्यंत अभय योजनेचा तिसरा टप्पा राबवला जाईल. मंडळाच्या अखत्यारीतल्या २१ हजार १४९ संक्रमण शिबिरांमधल्या भाडेकरू आणि रहिवाशांना या योजनेचा लाभ होईल. सध्या थकित भाडे आणि त्यावरच्या व्याजाची थकलेली एकूण रक्कम १२९ कोटी ९२ लाख रुपये इतकी झाली असल्याचं मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.