खासगी बँकांना संचालक मंडळाच्या अध्यक्षपदी स्वतंत्र संचालकांची नियुक्ती करण्याचे रिझर्व बँकचे आदेश

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्व खासगी बँकांना संचालक मंडळाच्या अध्यक्षपदी स्वतंत्र संचालकांची नियुक्ती करण्याचे आदेश रिझर्व बँकेने दिले आहेत. यासंदर्भातले दिशानिर्देश बँकेने सोमवारी प्रसिद्ध केले. त्यानुसार सर्व खासगी बँका, लघु वित्त बँका आणि विदेशी बँकांच्या भारतीय उप बँकांना संचालक मंडळाच्या अध्यक्षपदी स्वतंत्र संचालकांची नियुक्ती करावी लागेल.

बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हे पद कुठल्याही व्यक्तीला १५ वर्षांपेक्षा अधिक काळ निभावता येणार नाही. ही व्यक्ती बँकेची प्रवर्तक किंवा मोठी समभागधारक असेल तर हा कालावधी १२ वर्षांपर्यंत कमी करण्यात आला आहे. या कालावधीनंतर पुढचे ३ वर्ष संबंधित व्यक्तीची या पदावर पुन्हा नियुक्ती करता येणार नाही.

या कालावधीत या व्यक्तीला बँकेच्या किंवा समुहाच्या कोणत्याही पदावर नियुक्त करता येणार नाही.  व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी कमाल वयोमर्यादा ७० तर स्वतंत्र संचालकांसाठी कमाल वयोमर्यादा ७५ निर्धारित करण्यात आली आहे.

येत्या १ ऑक्टोबर पर्यंत या दिशानिर्देशांची अंमलबजावणी करावी लागेल. सध्या या पदावर कार्यरत व्यक्तींना त्यांचा चालू कार्यकाळ पूर्ण करण्याची मुभा ही रिझर्व्ह बँकेने दिली आहे.