ऍस्ट्रा झेनेका कोविड लसीमुळे रक्तात गुठळी होत नसल्याचं युरोपिय औषध संस्थेचं आग्रही प्रतिपादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अॅस्ट्राजेनेका लसीमुळे रक्ताच्या गुठळ्या होत असल्याचा कोणताही पुरावा नाही असा दावा युरोपीय महासंघाच्या औषध नियंत्रकांनी केला आहे. कोरोना संकटामुळे दररोज हजारो लोकांचे जीव जात असताना युरोपीय देशांनी अॅस्ट्राजेनेका लशीचा वापर थांबवू नये अशी विनंती युरोपीय औषध संस्थेनं केली आहे. अॅस्ट्राजेनेका लस सुरक्षित आणि प्रभावी आहे यावर आपला विश्वास असल्याचं युरोपीय औषध संस्थेच्या प्रमुख एमर कूक यांनी सांगितलं.

युरोपीय देशांत हजारो लोकांच्या शरीरात रक्ताच्या गाठी अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे होत असतात. अॅस्ट्राजेनेकामुळे गाठी झाल्याचं वैद्यक शास्त्रीय अभ्यासात आढळून आलेलं नाही असं कुक यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, लसीमुळे रक्ताच्या गाठी होत असल्याचा कोणताही पुरावा नसल्याचं जागतीक आरोग्य संघटनेनंही सांगितलं आहे.