मागील वर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये राज्यात निर्माण झालेल्या कोरोना संसर्गाच्या गंभीर परिस्थितीची पुनरावृत्ती

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोरोना विषाणू संसर्ग वेगाने वाढत असून काल राज्यात 15 हजारांपेक्षा जास्त नवीन रुग्ण आढळून आले, तर कोरोनाबाधितांच प्रमाण 16पूर्णांक 26 शतांश टक्के इतकं जास्त वाढल्याने, मागील वर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये राज्यात निर्माण झालेली कोरोना संसर्गाची  गंभीर परिस्थिती आता पुन्हा निर्माण झाली आहे .  

राज्यातील कोविड 19 च्या उपचाराधीन रुग्णांची संख्या काल 1,10,485 पोहोचली आहे. यात सर्वाधिक म्हणजे 21,788 रुग्ण पुणे जिल्ह्यात उपचार घेत असून त्याखालोखाल नागपूर जिल्ह्यात 15,011 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यातील तुरळक जिल्हे वगळता उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली पाहायला मिळत आहे.

राज्यात दैनंदिन चाचण्यांच्या तुलनेत कालही कोरोनाबाधित आढळण्याचं प्रमाण जास्तच राहिलं. त्यामुळे अर्थातच उपचाराखाली असलेल्या संख्येत देखील वाढ नोंदवली गेली. काल दिवसभरात राज्यात पुन्हा नवीन कोरोना बाधित संख्येत वाढच दिसून आली .काल राज्यात 9,97,274 कोरोना  चाचण्या करण्यात आल्या त्यापैकी 15,817  नवीन कोरोनाबाधित आढळले. चाचण्यांच्या तुलनेत नवबाधितांचं हे प्रमाण 16.26% टक्के होतं.राज्यात कालपर्यंत 1,73,10,586 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 22,82,191 बाधित  आढळले.

राज्यात काल 11,344 रुग्ण कोरोनामुक्त झाले त्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 21,17,744 झाली आहे. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 92.79% आहे. राज्यात काल सर्वाधिक नवबाधित नागपूर महापालिका क्षेत्रात 1,729, पुणे मनपा क्षेत्रात 1,845 आणि मुंबई मनपा क्षेत्रात 1,647 नवबाधित आढळले. जळगाव, औरंगाबाद, नाशिक आणि पिंपरी चिंचवड मधील नवबाधितांची  संख्या कालही 500 हून अधिक नोंदवली गेली. राज्यात काल 56  कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली . कोविड 19 मुळे दगावलेल्यांची संख्या आता 52 हजार 723 झाली असून मृत्यूदर 2.31% शतांश टक्के आहे.