मुंबई (वृत्तसंस्था) : रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात अर्धशतकाहून अधिक काळ रसिकांवर आपल्या सहजसुंदर अभिनयाचा ठसा उमटवणारे ‘नटश्रेष्ठ’ श्रीकांत मोघे यांचं काल पुण्यात वृद्धापकाळानं निधन झाले.
ते ९१ वर्षांचे होते. एकेकाळी मराठी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रांत ‘चॉकलेट हिरो’ अशी प्रतिमा असलेले नायक वसंत कानेटकर यांच्या ‘लेकुरे उदंड जाहली’ नाटकामधील राजशेखर ऊर्फ राजा, पु. ल. देशपांडे यांच्या ‘वाऱ्यावरची वरात’मधील बोरटाके गुरुजी, ‘वाऱ्यावरची वरात’मध्येच ‘दिल देके देखो’ या गीतावर रंगमंचावर अक्षरश: शम्मी कपूर शैलीत नृत्य करून रसिकांना मनमुराद आनंद देणारे कलाकार अशी नटश्रेष्ठ श्रीकांत मोघे यांची ओळख होती.
मोघे यांनी ५० पेक्षा अधिक नाटकांतून विविध भूमिका केल्या तर २५ हून अधिक मराठी - हिंदी चित्रपट तसंच काही दूरचित्रवाणी मालिकांमध्येही त्यांनी काम केलं होतं. दिल्लीत संगीत नाटक अकादमीतल्या नोकरीनंतर त्यांनी दिल्ली तसंच मुंबई आकाशवाणी केंद्रावर वृत्तनिवेदक म्हणूनही काही काळ काम केलं होतं.
अजून यौवनात मी, अबोल झाली सतार, अश्रूंची झाली फुले, गारंबीचा बापू, घरोघरी मातीच्या चुली, तुझे आहे तुजपाशी, मृत्युंजय, वाऱ्यावरची वरात, सुंदर मी होणार या नाटकातील तर आम्ही जातो आमुच्या गावा, उंबरठा, कालचक्र, गंमत जंमत, दोन्ही घरचा पाहुणा, प्रपंच, भन्नाट भानू, सिंहासन तसंच सूत्रधार या चित्रपटातील त्यांच्या भूमिका लोकप्रिय ठरल्या होत्या.
सांगलीत झालेल्या ९२व्या मराठी नाट्यसंमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं. याशिवाय त्यांना अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आलं होतं. यात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा पुरस्कार, नानासाहेब फाटक पुरस्कार, राज्य सरकारचा प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार, कलागौरव पुरस्कार, शाहू छत्रपती पुरस्कार आदी पुरस्कारांचा समावेश आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.