महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संगणक प्रणालीवर सायबर हल्ला; सायबर गुन्हेगारी कक्षाकडे तक्रार दाखल
• महेश आनंदा लोंढे
मुंबई : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संगणकीय प्रणालीवर दि. २१ मार्च २०२१ रोजी पहाटे २.३० वाजेच्या सुमारास रेन्समवेअरचा सायबर हल्ला झाला. त्यामुळे महामंडळाची संपूर्ण संगणक यंत्रणा बंद पडली असून हल्लेखोरांनी खंडणीची मागणी ईमेलद्वारे केली आहे, असा खुलासा महाराष्ट्र औद्यागिक विकास महामंडळाच्या वतीने करण्यात आला आहे.
‘मऔवि’महामंडळाच्या सर्व प्रणाली ESDS (Cloude सेवा प्रदाता) आणि महामंडळाअंतर्गत स्थानिक सर्व्हरवर होस्ट केलेल्या आहेत. तसेच सुरक्षा व देखरेखीसाठी Trend Micro अँटी-व्हायरसचा वापर केला जातो. SYNack या रॅन्समवेअरने ‘मऔवि’महामंडळाच्या मुख्यालयात होस्ट केलेल्या लोकल सर्व्हर सिस्टीम आणि डेटा-बेस सेवांवर परिणाम केला आहे. तसेच राज्यातील प्रादेशिक कार्यालयांमध्ये असलेल्या संगणकांनाही बाधा पोहोचली आहे. हल्लेखोरांनी केलेल्या ईमेलमध्ये हल्ल्याची माहिती दिलेली आहे. मात्र खंडणीच्या रक्कमेचा थेट उल्लेख केलेला नाही.
सायबर हल्ल्यानंतर संगणकीय यंत्रणेत व्हायरसचा प्रसार होऊ नये यासाठी नेटवर्कवरून संगणक तातडीने डिस्कनेक्ट करण्यात आले आहेत. महामंडळाची एक खिडकी योजना, ईआरपी, बीपीएएमएस, संगणकीय भू-वाटप प्रणाली व पाण्याची देयके या यंत्रणांच्या बॅकअप फाइल्स वेगळ्या नेटवर्कवर संग्रहित केल्या असून त्या सर्व सुरक्षित आहेत.
महामंडळाचे संकेतस्थळ, एक खिडकी योजना (एसडब्ल्यूसी), बीपीएएमएस या ग्राहकाभिमुख सेवा योग्य सुरक्षा तपासणी करून चालू करण्यात आल्या आहेत. तसेच ईआरपी – पाण्याची देयक यंत्रणा (इआरपी- डब्ल्युबीएस), इंटिग्रेटेड फाईल मॅनेजमेंट सिस्टम (आयएफएमएस) या यंत्रणा ३१ मार्च २०२१ पर्यंत पुन्हा कार्यान्वित करण्यात येतील.
हा हल्ला नियंत्रणात आणण्यासाठी व त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी सायबर सुरक्षा तज्ज्ञांच्या शिफारसीनुसार कार्यवाही सुरू आहे. प्रकरणाची तक्रार मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हेगारी कक्षाकडे करण्यात आली आहे, असे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने कळविले आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.