राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध लागू

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोरोना विषाणू संसर्ग वेगानं वाढत असून, त्या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध लागू केले आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात आज आणि उद्या कडक बंद पाळला जात आहे. या टाळेबंदीत नागरिक स्वयंस्फूतीनं सहभागी झाले असून वाढता कोविड संसर्ग कमी होण्यासाठी मदत होऊ शकेल, असा विश्वास पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी व्यक्त केला.

गुप्ता यांच्यासह, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी, शहरातल्या विविध भागांमध्ये फिरुन टाळेबंदीचा आढावा घेतला, त्यानंतर ते वार्ताहारांशी बोलत होते.

नांदेड जिल्ह्यात २१ मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत, विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत. जिल्हा तसंच शहरातील सर्व शिकवणी वर्ग या काळात बंद राहतील. औषधी दुकानं वगळता इतर सर्व दुकानं सकाळी सात ते संध्याकाळी सात वाजेदरम्यान सुरू ठेवण्यात येतील.

नागपुरात उद्यापासून २१ मार्चपर्यंत घोषित झालेला लॉकडाऊन कडक राहणार असून कोरोनाबाधित व्यक्ति फिरतांना आढळली, तर प्रथम रुग्णालयात नंतर कोठडीत पाठवू. असा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला आहे.

धुळे जिल्ह्यात आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून, बुधवारी १७ मार्चला सकाळी सहा वाजेपर्यंत जनता संचारबंदी लागू राहणार आहे. या कालावधीत बससेवा, वैद्यकीय सेवा, दूध विक्री, शासकीय कार्यालय, बँका आणि वित्तीय सेवा, पेट्रोल पंप सुरू असतील.

नाशिकमधेही कोरोना बाधीतांची वाढती संख्या लक्षात घेता नाशिक शहरात तुर्तास निर्बंध कडक करणार असून कोरोना चाचण्या वाढवणार आहेत. शहरातल्या सर्व शाळा, महाविद्यालयं  आता ३१ मार्च पर्यंत बंद ठेवायचा निर्णयही घेण्यात आल्याची माहिती नाशिक महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी काल झालेल्या आढावा बैठकीनंतर वार्ताहरांना दिली.

Popular posts
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा भांडार व शिक्षण विभाग म्हणजे "उंदराला मांजर साक्ष" ; सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांचा आरोप
Image
कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर 40 हून अधिक लसांवर काम चालू असून, अद्याप कोणीही पुढील टप्प्यात पोहोचलेले नाही : आयसीएमआर
Image
देशाचा कोरोनारुग्ण बरे होण्याचा दर आता ९७ पूर्णांक ४८ शतांश टक्क्यांवर
Image
जयजीत सिंह यांची ठाण्याचे पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती
Image
भारतीयांना डावलून परदेशात कोविशिल्ड या लसीची निर्यात केलेली नाही- आदर पूनावाला
Image