पै. गोविंदराव तांबे यांना पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचा जीवनगौरव पुरस्कार जाहिर

 

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने कुस्तीक्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ व्यक्तींना दरवर्षी ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. 2020 या वर्षीचा जीवनगौरव पुरस्कार रहाटणी गावचे माजी सरपंच पै. गोविंदराव बाजीराव तांबे (वय 83 वर्षे) यांना जाहिर करण्यात आला आहे.

चिंचवड गावात झालेल्या पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाची बैठक घेण्यात आली. या बैठकीस महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष आणि पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते हणुमंत गावडे तसेच पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष आमदार महेश लांडगे, संघाचे सरचिटणीस संतोष माचूत्रे, खजिनदार दिलीप बालवडकर, भारत केसरी विजय गावडे, उपाध्यक्ष धोंडीबा लांडगे, विशाल कलाटे, काळूराम कवितके आणि कुस्ती क्षेत्रातील ज्येष्ठ पहिलवान, वस्ताद आदी उपस्थित होते.

पै. गोविंदराव तांबे यांनी कुस्तीक्षेत्राच्या विकासासाठी दिलेले योगदान महत्वपुर्ण आहे. तसेच रहाटणी गावासह पंचक्रोषीतील विकास कामांची पायाभरणी पै. तांबे यांच्या नेतृत्वाखाली झाली. त्यामुळेच हा परिसर वैभवशाली आहे. म्हणून पै. तांबे यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करावा असा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला. पै. गोविंदराव तांबे यांनी रहाटणी गावचे सरपंचपद साभाळत असतानाच गावातील भैरवनाथ तालमीत युवा पहिलवानांना मार्गदर्शन केले. ज्येष्ठ नेते बाबासाहेब तापकीर, तुळशीराम आप्पा नखाते, सुदाम कापसे, बाळासाहेब नखाते, आण्णासाहेब नखाते यांच्या सहकार्याने त्यांनी पिंपरी चिंचवड शहराच्या कुस्तीचा नावलौकिक राज्य पातळीवर वाढविला. शेकडो तरुण पहिलवान घडविले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे चिंरजीव पै. कृष्णा तांबे यांनी लाल मातीत नाव कमाविण्याचे ध्येय ठेवले. पै. कृष्णा तांबे हे सलग तीन वर्षे महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पदक मिळवून मैदान गाजविले. त्याचबरोबर पै. कृष्णा तांबे यांनी तीन वेळा राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धेत मैदान गाजवत उल्लेखनिय कुस्ती केली. पै. गोविंद तांबे यांची तिसरी पिढी म्हणजे त्यांचे नातू पै. स्वप्निल भानुदास तांबे आणि पै. साहिल कृष्णा तांबे तालमित सराव करीत आहेत.

कै. वस्ताद बाळासाहेब विठोबा गावडे प्रतिष्ठान आणि पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र केसरी निवड चाचणी स्पर्धा मंगळवारी (दि. 23 फेब्रुवारी) दुपारी 3 वाजता. रहाटणी येथील ‘थोपटे लॉन्स’ मध्ये होणार आहेत. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पै. गोविंदराव बाजीराव तांबे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.


Popular posts
अमेरिकी ट्रेझरी उत्पन्न वाढल्याने गेल्या आठवड्यात स्पॉट गोल्डचे दर १% नी घसरले
Image
सफाई कामगारांच्या पाल्यांना वारसा हक्क नियमानुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
Image
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा भांडार व शिक्षण विभाग म्हणजे "उंदराला मांजर साक्ष" ; सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांचा आरोप
Image
यूनियन बँकेने आंध्र बँकेच्या सर्व शाखांचे आयटी इंटिग्रेशन केले पूर्ण
Image
राज्यात येत्या ३० एप्रिलपर्यंत असलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी
Image