छत्रपती शिवाजी महाराजांची ३९१ वी जयंती राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : छत्रपती शिवाजी महाराजांची ३९१वी जयंती आज, राज्यभरात मोठ्या उत्साहानं पण कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करत साजरी केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेल्या, जुन्नर इथल्या शिवनेरी किल्ल्यावर पारंपरिक पद्धतीनं मोजक्या लोकांच्या उपस्थित शिवजन्म सोहळा झाला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे या सोहळ्याला उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जगभर पोचवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करू असं आश्वासन, मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांशी संवाद साधताना दिलं.
आपल्या सगळ्यांच्या मनात असलेलं शिवप्रेम हा आपल्या प्रत्येकाला समान धागा आहे, त्याचा एकत्र गोफ करून विणायला हवं, तोच राज्याच्या विकासाचा गोफ असेल असं मुख्यमंत्री म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हा महाराष्ट्राच्या भूमीत जन्म घेतलेल्या प्रत्येकाच्या आशा-आकांक्षांच्या - स्वप्नपूर्तीचा उत्सव असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे. राज्यातले कोट्यवधी युवक महाराजांच्या विचारांनुसार राज्याची अस्मिता जागृत ठेवायचं काम करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
मुंबईत महापौर किशोरी पेडणेकर यांनी गेट वे ऑफ इंडिया इथल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केलं. उपमहापौर अॅडव्होकेट सुहास वाडकर तसंच महानगरपालेकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनीही शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. यानिमित्तानं शिवरायांवरच्या काही पोवाड्यांचंही सादरीकरण झालं.
कोल्हापूर जिल्ह्यातही शिवजयंती उत्साह दिसून येत आहे. मात्र पोलिसांनी मिरवणूका काढायला बंदी घातली असल्यानं अनेक ठिकाणी शांततेत, साधेपणानं शिवजयंती साजरी केली जात आहे. पन्हाळगडावरही आज शिवजयंतीच्या उत्सव साजरा होतो आहे.
शिवजयंतीनिमीत्त ठिकठिकाणच्या गडकोटांवरून शिवप्रेमींनी शिवज्योती आणल्या आहेत. जिल्ह्यात शिवाजी महाराजांचे पुतळे असलेल्या ठिकाणी सजावट केल्याचं दृश्य सर्वत्र दिसतं आहे. पोवाड्यांनी परिसर दणाणून गेला होता. जिल्ह्यात सर्वत्रच शिवाजी महाराजांवरच्या पोवाड्यांचे सूर ऐकू येत आहेत.
धुळ्यात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी संजय यादव यांनी शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना अभिवादन केलं. सोलापूरमधे छत्रपती शिवाजी महाराज चौकातल्या महाराजांच्या पुतळ्याला सोलापूर महापालिकेच्या महापौर कांचनाताई यन्नम यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.