नवे कृषी कायदे देशातल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना विकासाकडे घेऊन जाणारे असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवे कृषीकायदे देशातल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना विकासाकडे घेऊन जातील, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल आभारदर्शक ठरावावरच्या चर्चेला उत्तर देत होते. १२ कोटीपेक्षा जास्त अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांच्या आकांक्षांची पूर्तता करणं हा या कायद्यांचा उद्देश आहे, असं ते म्हणाले. या चर्चेत एकाही विरोधी सदस्यांनं शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं कारण सांगितलं नाही, अशी टीका त्यांनी केली.सरकारनं २०१४ च्या पीकविमायोजनेची व्याप्ती वाढवली, त्याअंतर्गत ९० हजार कोटी रुपयांची भरपाई शेतकऱ्यांना दिली गेली.
पीएम-किसान योजनेअंतर्गत देशातल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमधे १ लाख १५ हजार कोटी रूपये थेट जमा केले. मोठ्या आणि अधिक फायदा देणाऱ्या बाजारपेठांपर्यंत शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल नेता यावा, यासाठी किसान रेल आणि किसान उड्डाण योजना सरकारनं सुरु केली आहे. असं त्यांनी नमूद केलं. गरीब आणि शेतकऱ्यांच्या विकासाबाबत सरकारची बांधिलकी मोदी यांनी पुन्हा एकदा व्यक्त केली. कृषी क्षेत्रात सुधारणा आणण्याच्या गोष्टी प्रत्येक सरकारनं केल्या. मात्र आता केवळ राजकीय स्वार्थासाठी कृषी सुधारणांबाबत विरोधीपक्षांची भूमिका पूर्णपणे बदलेली दिसते, असं ते म्हणाले. माजी प्रधानमंत्री मनमोहनसिंग यांनीही अशा प्रकारच्या सुधारणांची भलामण केली होती, अनेक राज्यांनी यापूर्वीच अशा प्रकारच्या कृषीसुधारणांची अंमलबजावणी केलेली आहे, कोणत्याही क्रांतीकारी सुधारणा होतात तेव्हा त्यावर मतभेद उद्भवणं ही स्वाभाविक गोष्ट आहे. हरीतक्रांतीलाही प्रारंभी विरोध झाला होता, मात्र हरीतक्रांतीमुळेच देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला, असं त्यांनी सांगितलं.
किमान आधारभूत दर कायम राहील आणि नव्या कायद्यांमुळे बाजारसमित्यांचं महत्त्व कमी होणार नाही, अशी ग्वाही प्रधानमंत्र्यांनी दिली. य़ा कायद्यांविरुद्ध आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या, हा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार अजूनही चर्चा करायला तयार आहे, असं ते म्हणाले. आंदोलनस्थळी असलेले वृद्ध आणि लहान मुलांबद्दल चिंता व्यक्त करून, त्यांनी घरी परतावं असं आवाहन मोदी यांनी केलं. आंदोलनात शेतकऱ्यांची, विशेषतः पंजाबमधल्या शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे, आंदोलनजीवी लोकांचा एक नवा वर्गच अलीकडच्या काळात उदयाला आला आहे, अशी टीका त्यांनी केली.
कोरोनाविरुद्ध देशाच्या लढाईत सहभागी असलेल्या सर्वांच्या प्रयत्नांची प्रशंसा प्रधानमंत्र्यांनी केली. कोरोनाच्या संकटकाळातही देशातली परदेशी गुंतवणूक वाढली, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.