कोकणातल्या सर्व ग्रामपंचायती सुंदर गाव होण्यासाठी गावविकासाचं मॉडेल आवश्यक - उदय सामंत

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कोकणातल्या सर्व ग्रामपंचायती सुंदर गाव होण्यासाठी गावविकासाचं एक मॉडेल तयार करण्याची आवश्यकता उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार मिळालेल्या ग्रामपंचायती आणि निवडलेल्या सुंदर ग्रामपंचायतींचा पुरस्कार वितरण समारंभ काल रत्नागिरीत झाला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यात संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानांतर्गत जिल्हास्तरावर २०१८-१९ या आर्थिक वर्षात गुहागर तालुक्यातल्या अंजनवेल ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांकाचा पाच लाखाचा, खेड तालुक्यातल्या जामगे ग्रामपंचायतीला तीन लाखाचा दुसरा, तर चिपळूण तालुक्यातला वालोपे ग्रामपंचायतीला तिसऱ्या क्रमांकाचा दोन लाखाचा पुरस्कार यावेळी देण्यात आला. जिल्ह्यातल्या ५५ ग्रामपंचायतींना उत्कृष्ट ग्रामपंचायत आणि गेल्या आर्थिक वर्षात सुंदर गाव म्हणून निवड झालेल्या १८ गावांचाही सन्मान करण्यात आला.

वर्धा जिल्ह्यात, २०१९-२० चा जिल्हास्तरीय आर.आर.पाटील सुंदर ग्राम पुरस्कार सेलू तालुक्यातील कोटंबा आणि आर्वी तालुक्यातील बाजारवाडा ग्रामपंचायतीनं  पटकावला असून दोन्ही ग्रामपंचायतींना ४० लाखांचा पुरस्कार विभागून देण्यात आला.   गावातील स्वच्छता, व्यवस्थापन, उत्तरदायित्व, अपारंपरिक उर्जा, पर्यावरण, पादर्शकता आणि तंत्रज्ञानाचा वापर करुन स्मार्ट गाव बनवणाऱ्या ग्रामपंचायतींना आर.आर.पाटील सुंदर ग्राम पुरस्कारानं सन्मानित केलं जातं. महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त यावर्षी महात्मा गांधी स्वच्छ ग्राम स्पर्धा राबवण्यात आली. यात रसुलाबाद ग्रामपंचायतीला  प्रथम, आनंदवाडीला  द्वितीय तर महाकाळ ग्रामपंचायतीला  तृतीय पुरस्कार मिळाला.