वस्तू आणि सेवाकर प्रक्रियेच्या सुलभीकरणासाठी पुकारलेल्या देशव्यापी बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वस्तू आणि सेवाकर प्रक्रियेचे सुलभीकरण करावं यासाठी कॉन्फडेरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने आज पुकारलेल्या देशव्यापी बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला.

बीड जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. बंदमुळे व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवली होती. बंददरम्यान बीड जिल्हा व्यापारी संघटना, शहर कापड संघ, आणि आदर्श मार्केट संघटनेनं निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांना आपल्या मागण्यांचं निवेदनही दिलं.

हिंगोली जिल्ह्यातही व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवून, देशव्यापी बंदला पाठिंबा दिला. हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघ, हिंगोली जिल्हा कर सल्लागार संघटना आणि जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यांच्या इतर संघटना या बंदमध्ये सहभागी झाल्या होत्या.लातूर जिल्हा व्यापारी संघानंही आजच्या बंदला पाठिंबा दिला होता. मात्र कोरोनामुळे पुढचे दोन दिवस संचारबंदी असल्यानं इथं व्यवहार सुरुच होते.

जालना जिल्ह्यातही नवीन मोंढ्यातल्या सर्व व्यापाऱ्यांनी दिवसभर आपले व्यवहार बंद ठेवले. कापड व्यावसायिकही बंदमधे सहभागी झाले होते. तर ग्रामीण भागात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंद दरम्यान जिल्हा व्यापारी महासंघाच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांना मागण्याचं निवेदन सादर केलं.परभणी जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. परभणी शहरातल्या व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उघडली नाहीत त्यामुळे इथल्या बाजारपेठेत शुकशुकाट  होता. दुपारनंतर मात्र हळूहळू बाजारपेठा खुल्या झाल्या.