चेन्नई मेट्रो दुसऱ्या टप्प्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उद्घाटन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज एका दिवसाच्या चेन्नई दौर्या वर आहेत. या दौऱ्यात मोदी यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन होणार आहे. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी ३ हजार ७७० कोटी रुपये खर्चाच्या चेन्नई मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन करतील. चेन्नई बीच आणि अथिपट्टू या दरम्यानच्या २९३ कोटी रुपये खर्चाच्या रेल्वे विद्युतीकरण प्रकल्पाचे उद्घाटन तसेच दोन हजार ६४० कोटी रुपयांच्या कल्लनाई कालवा विस्तार प्रकल्पाची आणि थायूर येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या शोध प्रकल्पाची पायाभरणी मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तसेच वाशरमेनपेट ते विम्को नगर पर्यंतच्या मेट्रोच्या नऊ किलोमीटर विस्तारित प्रकल्पाचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. त्याचबरोबर स्वदेशी अर्जुन मेन एमके –वन ए रणगाड्याच हस्तांतरण देखील मोदी यांच्या हस्ते भारतीय सैन्यादलाकडे केले जाणार आहे.

प्रधानमंत्री मोदी आज केरळलाही जाणार आहेत. याठिकाणी ते प्रॉपिलिन डेरिव्हेटिव्ह पेट्रोकेमिकल प्रकल्प देशाला अर्पण करणार आहेत. या प्रकल्पायामुळं आयात कमी होऊन दरवर्षी जवळपास चार हजार कोटी रुपयांचं परदेशी चलन वाचणार आहे. याशिवाय कोचीन इथं रो-रो बोट सेवेचंही मोदी उद्घाटन करतील. यामुळ व्यापाराला चालना मिळतानाच वाहतूक खर्च आणि वेळ वाचणार आहे. मोदींच्या हस्ते कोचीन बंदरावर सागरिका या आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनलचंही उद्घाटन होणार आहे. अशा प्रकारचा भारताचा पहिलाच टर्मिनल असेल.