सर्वांसाठी घरं देण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आश्वासन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वांसाठी घरं देण्याचं आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलं असून गरीबांचे हाल संपुष्टात आणण्याची वेळ आली असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. ते आज जीएचटीसी अर्थात जागतिक गृहनिर्माण तंत्रज्ञान आव्हान उपक्रमाअंतर्गत लाईट हाऊस प्रकल्पांची व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पायाभऱणी करताना बोलत होते.

लोकांच्या कल्याणासाठी तंत्रज्ञानाचा किती उत्तम वापर करता येतो, हे या प्रकल्पातून दिसतं. नागरी गृह निर्माणाची गरज पूर्ण करण्यासाठी हे प्रकल्प उपयुक्त ठरतील, असं ते म्हणाले.

आधीच्या सरकारांच्या प्राधान्यक्रमात गृहनिर्माण योजनांना स्थान नव्हतं, मात्र सर्वांगिण विकासाशिवाय आमूलाग्र बदल शक्य नाही हे सध्याच्या सरकारनं ओळखलं, त्यामुळे देशानं नवा दृष्टिकोन आणि वेगळी वाट स्वीकारली असल्याचं त्यांनी सांगितलं.