नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय स्वातंत्र्य चळवळीत ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आझादी दुंगा’ असा नारा देणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज 125वी जयंती आहे. त्यानिमित्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेताजींना ट्विटरच्या माध्यमातून आदरांजली वाहिली आहे. नेताजींच्या असीम धैर्य आणि पराक्रमाच्या सन्मानार्थ आजचा दिवस 'पराक्रम दिवस' म्हणून साजरा करणे हे यथोचितच आहे असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे.

भारतीय स्वातंत्र्य संग्रामात नेताजींचे अभूतपूर्व योगदान असून ते अतिशय लोकप्रिय नेते होते आणि त्यांचा त्याग भारतीय जनतेला सदैव प्रेरणादायी राहील अशा शब्दात उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी सुभाषचंद्र बोस यांना आदरांजली वाहिली आहे. तर, नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारतमातेचे सच्चे सुपुत्र होते आणि त्यांनी केलेल्या देशसेवेसाठी देश सदैव त्यांचा ऋणी राहील अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या आदरभावना व्यक्त केल्या आहेत. नेताजींच्या जयंतीनिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

नेताजींच्या जन्मगावी कटक येथील वस्तुसंग्रहालयात आज विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक मंत्रालयाने एक भारत श्रेष्ठ भारत या अभियानाअंतर्गत हा कार्यक्रम आयोजित केला आहे. दरवर्षी नेताजींच्या या जन्मगावाला भेट देण्यासाठी बहुसंख्येने नागरिक येतात. गोव्यात पणजी येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही आज नेताजींना आदरांजली म्हणून श्याम बेनेगल यांचा 'नेताजी सुभाषचंद्र बोस - द फरगॉटन हिरो' हा चित्रपट दाखवला जाणार आहे.

कोलकता येथे होणाऱ्या पराक्रम दिवस सोहळ्याच्या उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी नेताजींच्या स्मृतीप्रित्यर्थ काढलेल्या नाण्याचे आणि टपाल तिकीटाचे प्रकाशन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. तसेच नेताजींच्या आयुष्यावरील कायमस्वरुपी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.