पुणे जिल्ह्यातील सर्व ऐतिहासिक स्मारकं आजपासून पर्यटकांसाठी खुली

 

पुणे (वृत्तसंस्था) :कोरोना प्रतिबंधक निर्बंधांमुळे बंद असलेला पुण्यातला ऐतिहासिक शनिवारवाडा आज पर्यटकांसाठी उघडणार आहे.

आगाखान पॅलेस, कार्ला आणि भाजे येथील लेण्या, शिवनेरी किल्लाही आज पासून पर्यटकांसाठी खुला करण्यात येत असून जिल्ह्यातील सर्व ऐतिहासिक स्मारकं आणि संग्रहालयं खुली करण्याचे आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी काल जारी केले.

राज्य शासनातर्फे अनलॉकच्या प्रक्रियेत टप्प्या टप्प्यानं नियमांमध्ये शिथिलता देण्यात येत आहे. त्यानुसारच आता ही ऐतिहासिक स्थळं, स्मारकं सुरू करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सहमती दर्शविली आहे.

मात्र, त्यासाठी नागरिकांना कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करावं लागणार आहे. प्रवेशही सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंतच दिला जाईल.