पिस्टल व जिवंत काडतुसे बेकायदेशीरपणे बाळगणाऱ्या आरोपींस अटक

 

गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

पिंपरी : पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट 2 कडून दिनांक ०४/०१/२०२१ रोजी, पोलीस आयुक्त श्री.कृष्ण प्रकाश यांच्या आदेशाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.अमरनाथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली रेकॉर्डवरील आरोपी चेकिंग करून, जबरी चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने, गुन्हेगार चेकिंगची व्यापक मोहीम राबवण्यात येत आहे.

पोलीस उपनिरीक्षक एच.डी.निलपत्रेवार यांच्या समवेत सपोफौ केराप्पा माने, पोलीस हवालदार शिवानंद स्वामी, जयवंत राऊत, नामदेव राऊत, अजित सानप, आतिष कुडके, शिवाजी मुंडे नामदेव कापसे असे निगडी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना पोलीस कॉन्स्टेबल अजित सानप यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकरवी बातमी मिळाली की,एक इसम रवींद्र गणपत येवले राहणार वाकसाई हा त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुस जवळ बाळगुन असुन, तो गुरुद्वारा चौकाकडून आकुर्डी रेल्वे स्टेशन कडे येणाऱ्या रोडवर, मोटर सायकल वरून येणार असल्याची बातमी मिळाली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.अमरनाथ वाघमोडे यांना बातमीचा आशय कळवुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापळा लावून, आरोपी रविंद्र गणपत येवले वय 21 वर्ष, धंदा ड्रायव्हर, राहणार मारुती मंदिर जवळ, वाकसाई पो. वेहेरेगाव, तालुका मावळ, जिल्हा पुणे यास शिताफीने अटक केली. त्यांची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुस मिळून आले. आरोपी रवींद्र गणपत येवले यांच्याविरुद्ध निगडी पोलिस ठाणेकडे भारतीय शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 3 (25) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) सह 135 प्रमाणे पोकॉ नामदेव महादेव कापसे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त श्री.कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त श्री.रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्री.सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री.आर.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखा युनिट 2 चे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक संजय निलपत्रेवार, पोलीस अंमलदार केरप्पा माने, शिवानंद स्वामी, दिपक खरात, उषा दळे, जयवंत राऊत, विपुल जाधव, जमीर तांबोळी, नामदेव राऊत, अजित सानप, नामदेव कापसे, आतिष कुडके, शिवाजी मुंढे यांच्या पथकाने केली आहे.