मुख्यमंत्र्यांनी केली राज्य पोलीस दलाच्या कामगिरीची प्रशंसा

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य पोलीस दलाच्या कामगिरीची प्रशंसा केली आहे. नववर्षदिनी आज मुख्यमंत्र्यांनी मुंबई पोलीस आयुक्तालयाला भेट देऊन कोविड योद्धे आणि उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं.

मुंबई पोलीसांनी कालची रात्र जागून काढली म्हणून आज आपल्याला नवीन वर्षाचा पहिला दिवस उत्साहात साजरा करता आला. यासाठी पोलिसांना धन्यवाद द्यायला एक कुटुंब प्रमुख आणि नागरिक म्हणून आपण आल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

नवीन वर्ष राज्यातल्या पोलीस दलासाठी तणावमुक्तीचं जावं, अशी शुभेच्छा त्यांनी दिली. कोरोनाच्या संकटकाळात अनेक जणांना वर्क फ्रॉम होम ची सोय होती, मात्र पोलिसांना हा पर्याय नसल्यानं आपलं कर्तव्य बजावताना अनेकांना प्राण गमवावे लागले, याकडे त्यांनी लक्ष वेधलं कोविड योद्धा म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा तसंच उत्कृष्ट तपास करून, तातडीनं मुद्देमाल संबंधितांना मिळवून देणाऱ्या पोलीसांचा मुख्यमंत्र्यांनी यावेळी सत्कार केला.

मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.