शास्त्रज्ञांनी कोरोनावर अल्पावधीत लस विकसित करून, मानवतेच्या कल्याणाचा नवा इतिहास घडवला- राष्ट्रपती

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केले.  भारतीय शास्त्रज्ञांनी अल्पावधीतच कोरोना विषाणूवर लस विकसित करून, मानवतेच्या कल्याणाचा नवा इतिहास घडवल्याचे प्रतिपादन राष्ट्रपतींनी यावेळी केले.

विकसित देशांच्या तुलनेत कोविड संसर्ग तसेच मृत्यू दरावर नियंत्रण मिळवण्यात, देशभरातले डॉक्टर, प्रशासकीय यंत्रणा आणि अन्य कोविड योद्ध्यांचे योगदान अमूल्य असल्याचं, ते म्हणाले.

आत्मनिर्भर अभियान आता लोकचळवळीचे रूप घेत आहे, या माध्यमातून आपले अनेक राष्ट्रीय संकल्प स्वातंत्र्यांच्या ७५ व्या वर्षापर्यंत पूर्ण होतील, असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला.

सर्वसमावेशक समाजाच्या निर्मितीसाठी, शिक्षण, आरोग्य, वंचित घटकांचं उत्थान आणि महिला कल्याणावर विशेष भर दिला जात असल्याचे सांगतानाच, राष्ट्रपतींनी, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या घटनात्मक नैतिकतेच्या मार्गावर सातत्याने चालत राहण्याचे आवाहन केलं.

अन्नसुरक्षा, उद्योग, शिक्षण, संरक्षण, परराष्ट्र संबंध, यासह विविध विषयांवर राष्ट्रपतींनी मार्गदर्शन केले. संसदेने संमत केलेले नवे कायदे शेतकरी तसेच कामगार हिताचे असल्याचे, राष्ट्रपतींनी नमूद केले.