संचारबंदीमुळे हॉटेल आणि उपाहारगृहचालकांच्या चिंतेत वाढ

 

मुंबई (वृत्तसंस्था) : महापालिका क्षेत्रासाठी जाहीर केलेल्या रात्रीच्या संचारबंदीमुळे हॉटेल आणि उपाहारगृहचालकांच्या चिंतेत वाढ झाली असून, नुकतेच सावरू लागलेल्या या व्यवसायाला मोठा फटका बसण्याची शक्यता संघटनांकडून व्यक्त केली जात आहे.

संचारबंदीमुळे नाताळ आणि वर्षअखेरच्या काळातील व्यवसाय कमी होऊन दिवसाला सुमारे 50 कोटी रुपयांची उलाढाल कमी होण्याची शक्यता असल्याचं मत हॉटेल अॅरण्ड रेस्टॉरंट असोसिएशनच्या पश्चिम विभागाचे उपाध्यक्ष प्रदीप शेट्टी यांनी व्यक्त केलं.

जिल्ह्य़ांमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यामुळे पर्यटनस्थळांवरदेखील निर्बंध येण्याचे सावट दिसू लागलं आहे.

रात्रीच्या संचारबंदीमुळं पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील हॉटेल व्यावसायिकांचे किमान 8 ते 10 कोटी रुपयांचं नुकसान होणार असल्याचं या व्यावसायिकांच्या संघटनेनं म्हटलं आहे .कोरोना टाळेबंदीनंतर अवघ्या दोन महिन्यांपूर्वी पुन्हा सुरु झालेला हा व्यवसाय आत्ता कुठे पूर्वपदावर येऊ लागला असतानाच आणि ऐन नाताळ तसंच 31 डिसेंबरच्या वेळीच रात्रीच्या संचारबंदीचे नवे निर्बंध जारी केल्यानं हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका बसणार असल्याचं पुणे हॉटेल्स अँड रेस्टॉरंट्स असोसिएशन नं प्रसिद्धीस केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

आधीच कोणत्याही हॉटेलमध्ये क्षमतेच्या 50 टक्क्याहून अधिक लोकांना परवानगी नसताना आता नवे निर्बंध लादून हा व्यवसायच डबघाईला येण्याची भीती  संघटनेचे उपाध्यक्ष विक्रम शेट्टी यांनी व्यक्त केली आहे .