ओटीटी मंचावर आता माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा अंकुश


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑनलाईन चित्रपट, दृकश्राव्य कार्यक्रम, बातम्या, ताज्या घडामोडींवर आधारित कार्यक्रम यावर आता माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा अंकुश असणार आहे. केंद्र सरकारनं अशा आशयाचा आदेश जारी केला आहे. ओटीटी म्हणजे ओव्हर दि टॉप मंचावरुन सादर केले जाणारे कार्यक्रम या मंत्रालयाच्या निगराणीखाली असतील.

आत्तापर्यंत डिजिटल माध्यमातून सादर होणारे कार्यक्रम, चित्रपट, बातम्या यावर नियंत्रण ठेवणारा कुठलाही कायदा अथवा एकच एक संस्था अस्तित्वात नव्हती. मात्र सरकारनं आज जारी केलेल्या राजपत्रात नवा निर्णय नमूद करण्यात आला आहे. माध्यम स्वातंत्र्यावर बंधनं येतील असं सरकार काहीही करणार नाही, असं गेल्याच वर्षी माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं होतं.