हाथरस प्रकरणी काँग्रेस पक्षाच्यावतीने मुंबईत सत्याग्रह आंदोलनमुंबई (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातल्या हाथरस इथं तरूणीवर लैंगिक अत्याचार आणि हत्येप्रकरणी पीडितेच्या कुटुंबियांना न्याय देण्याच्या मागणीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज राज्यभरात सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं. मुंबईत मंत्रालय परिसरात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मुंबई अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालं.हिंगोली शहरातही महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर  काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज दिवसभर सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं. माजी आमदार डॉ. संतोष टारफे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. 


धुळे इथंही आज विविध पक्ष आणि संघटनांनी या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन केलं. जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, सत्यशोधक विद्यार्थी संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेस युवती सभा यांनी निषेध आंदोलन केलं.


सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीनंही आज कुडाळ इथं हाथरस प्रकरणी सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं. यावेळी जिल्हाभरातून काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उर्फ़ बाळा गावडे यांच्या नेतृत्वाखाली हा सत्याग्रह करण्यात आला. 


परभणी इथंही जिल्हा आणि शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलेल्या सत्याग्रह आंदोलनात केलं. आमदार सुरेश वरपुडकर, शहराध्यक्ष नदीम इनामदार आदी यावेळी उपस्थित होते. 


नाशिक इथही आंदोलनं सुरूचं असून आज जिल्हा काँग्रेसच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. 


काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, शहराध्यक्ष शरद आहेर यांच्यास अन्य पदाधिकारी सहभागी झाले होते. वंचित बहुजन आघाडीच्या वतीनंही धरणे आंदोलन करण्यात आलं.