मनपाच्या रुग्णालयास माता रमाई आंबेडकर नाव द्या - प्रमोद क्षिरसागर


पिंपरी : गेली 17 वर्ष पासून प्रलंबित असलेल्या सेक्टर नं 22 येथील महानगरपालिकेच्या रुग्णालयास व प्रसूतिगृहास "माता रमाई आंबेडकर" हे नाव देण्यात यावे या मागणीसाठी स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते नेते आदींनी मनपा आयुक्तांना वेळोवेळी पत्राद्वारे विनंती निवेदने दिलेली असताना, सेक्टर नं 21 हा भाग यमुनानगर नावाने ओळखला जात असताना व सेक्टर नं 22 डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत या ठिकाणी सदरचे रुग्णालय व प्रसूतिगृह स्थित असताना, यमुनानगर रुग्णालय हे नाव देण्याचा काही एक संबंध येत नाही. किंबहुना स्थानिक नागरिकांची तशी मागणीही नसताना जबरदस्तीने यमुनानगर रुग्णालय असे नाव देऊन स्थानिक नागरिकांवर मनपाने आपली मनमानी लादली आहे. तरी स्थानिक नागरिकांच्या भावनेचा आदर करीत सदरच्या रुग्णालयास व प्रसूतिगृहास "माता रमाई आंबेडकर" यांचे नाव देण्यात यावे अशा आग्रही मागणी संबंधी स्थानिक नागरिकांनी लढा यूथ मूव्हमेंटकडे पाठपुरावा केला आहे.


त्यामुळे लढा यूथ मूव्हमेंट ने नागरिकांच्या भावनेचा आदर करीत मनपाच्या रुग्णालयास व प्रसूतिगृहास येत्या पंधरा दिवसाच्या आत "माता रमाई आंबेडकर" यांचे द्यावे, अशी मागणी निवेदना द्वारे मा. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.


सदरील निवेदनावर लढा यूथ मूव्हमेंटचे प्रमुख प्रमोद क्षिरसागर, भैयासाहेब ठोकळ, अमित गोरे, सिद्धार्थ मोरे, समाधान कांबळे, संदीप माने, राष्ट्रतेज सवई आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.