आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमांमुळे शिक्षणसंस्थांना भविष्यवेधी दृष्टीकोन मिळेल- प्रधानमंत्रीनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्याचा काळ भविष्यासाठी विचारपूर्वक तयार होण्याचा आणि त्यासाठी अधिकाधिक सुयोग्य होण्याचा आहे. त्याकरिता आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम महत्त्वाची भूमिका बजावतील.


अशा अभ्यासक्रमांमुळे शिक्षणसंस्थांना भविष्यवेधी दृष्टीकोन मिळेल आणि त्याचे वास्तववादी प्रतिबिंब वर्तमानकाळात, विद्यार्थ्यांच्या शिक्षणातही दिसून येईल. असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.


गुवाहाटी इथल्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेचा, म्हणजेच आयआयटीचा पदवी प्रदान समारंभ आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पार पडला. त्यामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बोलत होते. आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोख्रीयाल निशंक आणि केंद्रीय शिक्षण राज्य मंत्री संजय धोत्रे या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते.  शिक्षण आणि अध्यायनामध्ये तंत्रज्ञानाची महत्त्वाची भूमिका असून त्यासाठी संशोधनाला चालना दिली पाहिजे. ज्ञानाला कोणत्याच सीमा, मर्यादा नसतात हे लक्षात ठेवून संशोधक विद्यार्थांनी नवी नवी क्षेत्र शोधत संशोधनाद्वारे त्यांना संपन्न बनवावं, असं सांगतानाच आपण सर्वजण आत्मनिर्भर भारताच्या विजयरथाचे सारथी व्हा, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना केलं.

ईशान्येकडील राज्यं नैसर्गिक साधन संपत्तीनं समृद्ध असून तिथं गुणवत्ता आणि परिश्रम या दोन्हीही बाबी उपलब्ध आहेत. मात्र, या भागात सतत काहीना काही आपत्तीही येत असतात. त्याच्या प्रतिबंधासाठी या संशोधनाचा उपयोग कसा करता येईल, हे विद्यार्थ्यांनी पहावं, असही मोदी म्हणाले.