कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचं पालन करत राज्य विधिमंडळाचं दोन दिवसांचं पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरु



मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधिमंडळाचं दोन दिवसांचं पावसाळी अधिवेशन, आजपासून मुंबईत सुरु झालं. विधानसभा आणि विधानपरिषदेच्या कामकाजाला आज वंदेमातरम्नं सुरुवात झाली. आज पहिल्याच दिवशी, २९ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात, वित्तमंत्री अजित पवार यांनी सादर केल्या. 



राज्यातल्या मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्यावर प्रशासक नेमण्याबाबत सरकारने मांडलेले विधेयक संविधान संमत नसून उच्च न्यायालयात सरकारनं घेतलेल्या भूमिकेशी विसंगत असून ते मांडण्यास विरोधकांनी विधानसभेत विरोध केला तो उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी अमान्य केल्यानं विरोधकांनी सभागृहातून सभात्याग केला. त्याआधी उपाध्यक्षांनी बालाजी किणीकर, दौलत दरोडा, संग्राम थोपटे आणि कालिदास कोलंबकर यांची तालिका अध्यक्ष म्हणून यांची नेमणूक केल्याचं जाहीर केलं.


विधानपरिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक उद्या होणार असल्याचं सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज विधानपरिषदेत जाहीर केलं. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करावा अशा सूचना सभागृह नेते अजित पवार यांना सभापतींनी यावेळी दिल्या होत्या.


दरम्यान महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेच्या निलम गो-हे यांची तर भाजपाच्या वतीनं भाई गिरकर यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. 


प्रसाद लाड, मनीषा कायंदे, संजय दौंड आणि अमरनाथ राजूरकर यांची तालिका सभापती म्हणून सभापतींनी आज नावं जाहीर केली.  शिवसेनेच्या डॉ नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, काँग्रेसचे राजेश राठोड, तसंच भाजपच्या रणजित सिंह मोहिते पाटील, रमेश कराड, प्रवीण दटके या नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय सभागृहाला करून देण्यात आला.


माजी राष्ट्रपती डॉ प्रणव मुखर्जी, माजी मुख्यमंत्री डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर तसंच माजी सदस्य विजय मुडे, रामनाथ मोते, बलभीमराव देशमुख, युनूस हाजी शेख आणि जयंतराव ठाकरे यांच्यासह अन्य दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली वाहणारा शोक प्रस्ताव विधानसभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, तर विधानपरिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडला आणि दोन्ही सभागृहाच्या वतीनं श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. 


सामान्य माणूस ते राष्ट्रपती पदापर्यंतचा भारतरत्न माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी असा प्रवास करताना ते अजात शत्रू राहिले हे त्याचे वैशिष्टे होते, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या शोकप्रस्तावात काढले.


प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपती पदाला यथोचित न्याय दिलाच, मात्र त्यांना देण्यात आलेल्या जबाबदाऱ्या त्यांनी अतिशय निष्ठेनं निभावल्या, अशा शब्दात अजित पवार यांनी प्रणव मुखर्जी यांना श्रध्दांजली वाहिली. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई, काँग्रेस गटनेते शरद रणपिसे, शेकापचे जयंत पाटील यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.