महानगरपालिका व महावितरण याच्यामध्ये बैठक


पिंपरी : भोसरी मधील इंद्रायणीनगर येथे रोहित्राच्या स्फोटामुळे घडलेली घटना अत्यंत दुर्देवी आहे. अशा प्रकारच्या घटना यापुढे घडू नयेत यासाठी शहरातील सर्व विद्युत रोहित्रांचे सर्व्हेक्षण करून धोकादायक रोहित्रांच्या ठिकाणी सुरक्षेसाठीच्या सर्व उपाययोजना आणि संरक्षणात्मक बाबींची तात्काळ पूर्तता करण्याच्या सूचना महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी दिल्या.


पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आज महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका आणि महावितरणच्या अधिका-यांची बैठक मनपाच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये पार पडली त्यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीस उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसदस्य विक्रांत लांडे, तुषार कामठे, अतिरिक्त आयुक्त प्रवीण तुपे, उपआयुक्त सुभाष इंगळे, मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, मुख्य उद्यान अधिक्षक दत्तात्रय गायकवाड, कार्यकारी अभियंता प्रमोद ओंभासे, देवन्ना गट्टूवार, थॉमस नरोन्हा, दिलीप धुमाळ, प्रवीण घोडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिलवाल, उपअभियंता माधव सोनावणे, महावितरणचे अधिक्षक अभियंता पंकज टगलपल्लेवार, कार्यकारी अभियंता राहुल गवारे, शिवाजी वायफळकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता दत्तात्रय बालगुडे, अशोक जाधव, भुजंगराव बाबर, चौधरी, कवडे आदी उपस्थित होते.


महापौर उषा उर्फ माई ढोरे म्हणाल्या, इंद्रायणीनगर येथील रोहित्र स्फोटाची घटना हृदयद्रावक होती. त्यातील मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक भरपाई देण्यासाठी महावितरणने तातडीने कार्यवाही करावी. भविष्यात अशा दुर्घटना होऊ नयेत यासाठी रोहित्राच्या परिसरातील अतिक्रमण काढण्यासाठी महानगरपालिका, पोलीस आणि महावितरण यांनी संयुक्तपणे मोहिम राबवावी. रोहित्रांना संरक्षणात्मक कवच बसवून तेथे कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडणार नाही यासाठी स्वतंत्र अधिकारी नेमून वारंवार तपासणी करण्यात यावी अशा सूचना महापौरांनी दिल्या.


शहरातील लोकप्रतिनिधी त्या भागातील वीज वितरण महामंडळाच्या अधिका-यांच्या संपर्कात असतो. नागरिकांच्या वीजवितरणा संबंधी अनेक तक्रारी उद्भवत असल्यामुळे समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याचे उपमहापौर तुषार हिंगे यांनी यावेळी सांगितले. काही ठिकाणी रोहित्राचा परिसर आणि वीजेचे खांब देखील अतिक्रमित करण्यात आले आहेत, त्याकडे देखील महावितरणने लक्ष देणे आवश्यक आहे. वीज वितरण करण्यासाठीच्या एलटी बॉक्सची दुरुस्ती तातडीने करण्यात यावी. तसेच खोदकाम करताना महानगरपालिका आणि महावितरण यांनी समन्वय ठेवावा अशा सूचना देखील त्यांनी यावेळी केल्या.


सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी महावितरणने तातडीने पावले उचलावीत. शहराच्या दृष्टीने भविष्याचा विचार करून सर्व समावेशक विकास आराखडा तयार केल्यास नागरिकांना त्याचा फायदा होईल. रोहित्र परिसरातील अतिक्रमणांवर नियमाधीन कारवाई करून गरज पडल्यास गुन्हे दाखल करावेत. भूमिगत विद्युत वाहिन्या टाकण्यासाठी स्वतंत्र चेम्बरची व्यवस्था करणे आवश्यक आहे. निगडी येथे ट्रान्सपोर्ट हब तयार झाले आहे. याठिकाणी मेट्रो स्टेशन व चार्जिंग सेंटर प्रस्तावित आहे. तेथे अतिउच्चदाब सबस्टेशन उभारल्यास त्याचा फायदा या प्रकल्पांबरोबरच रावेत येथील जलउपसा व जलशुद्धीकरण केंद्राला देखील होणार आहे. त्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यास महानगरपालिका पुढाकार घेण्यास तयार असून महावितरणने या सब स्टेशनचा सविस्तर प्रस्ताव तयार करावा.


महावितरणचे अधिक्षक अभियंता पंकज टगलपल्लेवार म्हणाले, शहरातील रोहित्रांच्या परिसरांचे सर्वेक्षण सुरु असून अनेक ठिकाणी रोहित्रांना संरक्षणात्मक कवच बसविण्यात येत आहेत. इंद्रायणीनगर येथील दुर्घटनेसारख्या घटना यापुढे घडू नयेत यासाठी महावितरण खबरदारी घेईल असेही ते यावेळी म्हणाले. महानगरपालिका आणि महावितरण यांच्यामध्ये समन्वय राखण्यासाठी प्रभागवार बैठकीचे दरमहा आयोजन करण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले.