‘फीट इंडिया फ्रीडम रन’ मध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडू मधुरिका पाटकर यांचे आवाहन


नवी दिल्‍ली : मुंबई येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या प्रादेशिक केंद्राने आज टेबल टेनिस खेळाडू मधुरिका पाटकर यांच्याशी ऑनलाईन संवाद साधला. नुकताच अर्जुन पुरस्कार मिळवलेल्या मधुरिका पाटकर यांनी सध्या सुरु असलेल्या ‘फीट इंडिया फ्रीडम रन’ चे महत्त्व विशद केले.


क्रीडा मंत्रालयाने आयोजित केलेल्या फीट इंडिया फ्रीडम रनचे उद्घाटन 14 ऑगस्ट रोजी केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री किरेन रिजीजू यांच्या हस्ते करण्यात आले होते. फीट इंडिया फ्रीडम रन 2 ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे. क्रीडापटूंनी आणि समाजातील इतर व्यक्तींनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.


आपल्या देशाला तंदुरुस्त बनवण्याच्या दिशेने जाणारे हे एक पाऊल आहे. भारताला तंदुरुस्त देश बनवण्यासाठी आपण सर्वजण सहभागी होऊ शकतो. टाळेबंदीत आपण सर्वजण घरामध्ये होतो, पण आता हळूहळू बाहेर पडू शकतो, धावण्याशी जोडले जाण्याची ही उत्तम वेळ आहे. हा पायाभूत व्यायाम आहे. फीट इंडिया फ्रीडम रन सुरु केल्याबद्दल मी क्रीडा मंत्रालय आणि विशेषतः क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांचे आभार मानते. सर्वांनी फीट इंडिया फ्रीडम रनमध्ये सहभागी होण्याचे मी आवाहन करते, असे मधुरिका म्हणाल्या.  


मधुरिका यांनी तंदुरुस्तीबद्दल दिलेल्या माहितीबद्दल भारतीय क्रीडा प्राधिकरण, मुंबईच्या प्रादेशिक संचालक सुश्मिता ज्योत्सी यांनी कौतुक केले. सध्याच्या परिस्थितीत तंदुरुस्ती फार महत्त्वाची आहे, असे त्यांनी सांगितले. खेळाडू आपले राष्ट्रीय आयकॉन आहेत, त्यांनी जास्तीत जास्त लोकांना या रनमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करावे, असे त्या म्हणाल्या.