जिम चालकांच्या समस्या सुटणार ; कामगार नेते इरफानभाई सय्यद


शिवसेना सचिव तथा खासदार अनिल देसाईंची घेतली मुंबईत भेट  


पिंपरी : कोरोना व्हायरसचा संसर्ग सातत्याने वाढत आहे. त्यातच गेल्या पाच महिन्यांपासून जिम व्यवसाय संपूर्ण देशात ठप्प आहे. गृह मंत्रालयाने जारी केलेल्या नियमावलीप्रमाणे ५ ऑगस्टपासून राज्यात जिम खुले करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र , राज्य सरकारकडून त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. या व्यवसायावर अवलंबून असणारी हजारो कुटुंब आज आर्थिक अडचणीत आहेत. त्यांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या अनुषंगाने शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख तथा कामगार नेते इरफानभाई सय्यद आणि महाराष्ट्र जिम ऑनर असोसिएशनचे निलेश मोरे यांनी नुकतीच शिवसेना सचिव तथा खासदार अनिल देसाई यांची मुंबईत भेट घेऊन, त्यांच्यापुढे जिमचालकांच्या समस्यांचे गाऱ्हाणे मांडले व त्यांना याबाबत धोरणी निर्णय घेऊन राज्यातील जिमचालकांना दिलासा देण्याची निवेदनाद्वारे मागणी केली आहे.  


कोरोनाच्या लॉकडाऊन काळात महाराष्ट्रातील साधारणपणे १५००० जिम चालक, मालक, ट्रेनर हाउसकीपिंग कर्मचारी, योगा टीचर, झुंबा टीचर, डायटीशियन, मसाजिस्ट, न्यूट्रिशन दुकानाचे मालक, त्यांचे कर्मचारी, न्यूट्रिशन कंपनीचे कामगार, व्यायामशाळा साहित्य बनवणारे कामगार, तसेच इतर अनेक पूरक व्यवसायातील कामगार हे गेल्या पाच महिन्यापासून बेरोजगार आहेत. जिम व्यवसायिकांना लाखो रुपयांची थकीत भाडे, कर्मचारी पगार, लाईट बिल, मेंटेनन्स कसा भागवायचा याची चिंता लागली आहे. गेली अनेक महिने या व्यावसायिकांनी संयमाने सरकारी नियमांचे पालन करून सरकारला सहकार्य केले. परंतु, अनलॉक तीनमध्येसुद्धा जिमचालकांची निराशा झाली. विरोधाभास म्हणजे अनेक व्यवसाय ज्यांनी कोरोना पसरू शकतो ते चालू आहेत. परंतु, व्यायामशाळा ज्यामुळे रोग प्रतिकारकशक्ती वाढू शकते तो, व्यवसाय मात्र सरकारने बंद केला आहे. यावरून सरकार जिमचालकांच्या मागण्यांबाबत किती गंभीर आहे, याची कल्पना येते. 


सरकारचे राज्यातील जिमचालकांकडे दुर्लक्ष होत आहे. इतर क्षेत्रांना सरकारकडून आर्थिक अनुदान मिळाले मात्र, जिमचालकांना तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करावा लागत आहे. राज्यातील सर्व जिमचालकांनी जिम चालू करण्यासाठी विशेष नियमावलीदेखील तयार केली आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव टळेल. जिम चालू करण्यासाठी जिमचालकांची नियमावली पुढीलप्रमाणे :-   


१) प्रथम निर्जंतुकिकरण करून जिम सुरू केली जाईल. २) जिममध्ये येताना सर्वांचे टेंपरेचर चेक केले जाईल. ३) प्रत्येक मेंबरला हातमोजे, एक  नॅपकिन, एक टॉवेल व योगा मॅट बंधनकारक राहील. ४) जास्तीत जास्त मोकळी हवा कशी जिममध्ये येईल ह्याचा विचार करून एसी चा वापर बंद केला जाईल. ५ ) स्टीमबाथ, शॉवर, चेंजिंग रूम बंद राहील. ६) स्पेशल पोपुलेशन, जास्त वयाची व्यक्ती यांना जिममध्ये परवानगी नसेल. ७) सर्वांनी येताना एक मोठा टॉवेल आणि छोटा नॅपकिन आणायला सांगू व स्वतःचे सॅनेटरी करण्यासाठी सॅनिटाइझर वापरावेत. ८) प्रत्येक बॅच नंतर जिममधील वस्तू सॅनिटाईझ करता येतील. ९) पिक आवरमध्ये दोन ट्रेनर इतर वेळेत एक ट्रेनर फ्लोअरवर असेल. १०) जिमच्या प्रवेशद्वारावर Sanitation Stand लावले जाईल. ११) बाहेरील कोणत्याही वस्तू जिममध्ये अलाऊड नसतील. १२) व्यायामासाठी ५० मिनिटे वेळ दिला जाईल व ठरवलेल्या वेळेतच व्यायाम केला जाईल. १३) जिमच्या जागे प्रमाणे म्हणजे १००० Sqft मध्ये १०, ३००० Sqft मध्ये २५, ५००० Sqft मध्ये ३५ , व त्यावरील जागेत ४० अश्या प्रमाणे मेंबर घेऊ. १४) आरोग्य सेतु अॅप डाऊनलोड करणे प्रत्येकास बंधनकारक (केंद्र सरकारच्या आदेशानुसार) 


वरीलप्रमाणे जिमचालक स्वतः वरील सर्व नियमांचे पालन करून जिम चालू करण्यास तत्पर आहेत. राज्य शासनाने सहानुभूतीपूर्वक जिमचालकांच्या मागण्या मान्य कराव्यात. तसेच जिमचालकांना सुरुवातीच्या समस्यांना तोंड देण्यासाठी शासनाकडून आर्थिक सहकार्य मिळावे, असे या निवेदनात  महाराष्ट्र जिम ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र चव्हाण यांनी म्हटले आहे.  


मिशन बिगेन अगेनच्या अंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जूनच्या पहिल्या आठवड्यात अनेक छोट्या मोठ्या व्यवसायांना प्रतिबंधित क्षेत्र वगळता अनेक नियम आणि अटी लागू करून, व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली. यामध्ये बाजार, कपडा व्यापारी, डोमेस्टिक एअर लाइन्स, सलून व्यवसाय यांचा समावेश आहे. हॉटेल व्यवसायिक, लॉज, गेस्ट हाऊस यांना देखील परवानगी देण्यात आली आहे. मग जिम व्यवसायिकांनाचं परवानगी का देण्यात आली नाही. जिम व्यवसायिक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलेल्या लॉकडाऊनच्या नियमांचा अवलंब करण्यास तयार आहेत. या व्यवसायावर अवलंबून असणारी हजारो कुटुंब आज आर्थिक अडचणीत आहेत. जिममधे जिम ट्रेनर व इतरही कर्मचारी काम करतात. त्यांच्यावर आज उपासमारीची वेळ आली आहे. यासोबतच व्यायाम करणाऱ्यांसाठी आवश्यक असणारे प्रोटिन्सची दुकाने देखील बंद आहेत. त्यामुळे त्या व्यवसायिकांची देखील सध्या बिकट अवस्था आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने जिम चालकांच्या समस्या तात्काळ मार्गी लावाव्यात. जेणेकरून विस्कटलेली आर्थिक घडी सुरळीत होण्यास मदत होईल.