गुगल भारतात ७५ हजार कोटींची गुंतवणूक करणार - सुंदर पिचाई


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या ५ ते ७ वर्षांत गुगलतर्फे भारतात ७५ हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा आज गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी केली. ते आज गुगल फॉर इंडिया या ऑनलाईन कार्यक्रमात बोलत होते. प्रत्येक भारतीयाला स्वभाषेत माहिती प्राप्त होणं, भारताच्या विशिष्ट गरजांप्रमाणे वस्तू आणि सेवा विकसित करणं डिजिटल बदलांना आत्मसात करणा-या उद्योगांना मदत तसंच कल्याणकारी योजनांमधे कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर या चार क्षेत्रांसाठी ही गुंतवणूक वापरली जाईल, असं ते म्हणाले.


आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही सुंदर पिचाई यांच्याशी ऑनलाईन संवाद साधला, त्यात मुख्यत्वेकरुन भारतीय उद्योजक, शेतकरी आणि तरुण वर्गासाठी तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल, याचा समावेश होता. यावेळी गुगलने भारतात आणलेली नवी उत्पादनं तसंच कंपन्यांविषयी पिचाई यांनी माहिती दिली.


बंगळुरु इथली कृत्रिम बुद्धीमत्ता संशोधन प्रयोगशाळा, पुराचा अंदाज वर्तवणारी यंत्रणा तसंच कोविड विषयी अचूक आणि विश्वसनीय माहिती देणा-या यंत्रणेचा त्यांनी विशेष उल्लेख केला.


प्रधानमंत्री मोदी यांनी केलेल्या लॉकडाऊन सारख्या उपायांची यावेळी पिचाई यांनी प्रशंसा केली. विश्वसनीय माहिती जनतेपर्यंत पोचवण्यासाठी गुगलने केलेल्या प्रयत्नांबद्दल प्रधानमंत्री मोदी यांनीही समाधान व्यक्त केलं.