राज्यातलं सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही- विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडनवीस


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात ऑपरेशन लोटस राबवणार नसल्याचं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. ते आज दिल्लीत केद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर बातमीदारांशी बोलत होते.

भाजपा नेते हर्षवर्धन पाटील, धनंजय महाडिक, रणजीतसिंह मोहिते-पाटील, जयकुमार गोरे, रणजीत निंबाळकर, आणि जनसुराज्य शक्तीचे विनय कोरे या भेटीच्या वेळी त्यांच्यासोबत होते.

राज्यातल्या सत्ताधारी महाविकास आघाडीतल्या अंतर्गत मतभेदांमुळेच त्यांचं सरकार कोसळेल, त्यावेळी बघू, राज्यातलं सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही, सध्या कोरोनाशी लढा देण्याची गरज आहे, असं फडनवीस म्हणाले. 


शहा यांच्याशी आज झालेली भेट अ-राजकीय होती, राज्यातल्या साखर उद्योगासाठी आर्थिक सहाय्य मिळवणं हा या भेटीचा उद्देश होता, असं त्यांनी सांगितलं.