देशभरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 7 लाखाहून अधिक


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आज सकाळी संपलेल्या 24 तासात कोविड 19 चे  22 हजार 664 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या व्यक्तींची एकंदर संख्या 7 लाख 87 इतकी झाली आहे. देशातला रुग्ण बरे होण्याचा सरासरी दर आता 62 पूर्णांक 61 शतांश टक्के झाला आहे. सध्या एकंदर 3 लाख 90 हजार 459 रुग्णांवर देशभरात विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. 


गेल्या 24 तासात देशभरात 40 हजार 425 नवे कोरोनाबाधित आढळले असून कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून एकाच दिवसात एवढे कोविड रुग्ण आढळण्याची ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. देशात आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्या व्यक्तींची एकंदर संख्या 11 लाख 18 हजार 43 इतकी झाली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं देण्यात आली. काल दिवसभरात 681 रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे कोविडमुळे दगावलेल्या व्यक्तींची एकंदर संख्या आता 27  हजार 497 वर पोहोचली आहे.