परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांची अमेरिका आणि ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत द्विपक्षीय चर्चा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जर्मनीतल्या  साठाव्या म्युनिक सुरक्षा परिषदेत परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस. जयशंकर सहभागी होत आहेत. या परिषदेत डॉक्टर जयशंकर आज 'ग्रोइंग द पाई: सिझिंग शेअर्ड ऑपॉर्च्युनिटीज' या विषयावरच्या परिसंवादाला संबोधित करतील. या परिसंवादात जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री ॲनालेना बेरबॉक आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री ब्लिंकन हे परराष्ट्र मंत्रीही सहभागी होणार आहेत.

दरम्यान, डॉक्टर जयशंकर यांनी  द्विपक्षीय सहकार्याशी संबंधित मुद्द्यांवर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री ब्लिंकन आणि त्यांचे ब्रिटिश परराष्ट्र मंत्री डेव्हिड कॅमेरॉन यांच्यासह प्रमुख नेत्यांशी काल चर्चा केली.ब्लिंकन यांच्या भेटीदरम्यानची चर्चा पश्चिम आशिया, युक्रेन आणि इंडो-पॅसिफिकमधील परिस्थितीवर केंद्रित होती. तसंच भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंधांमधल्या  प्रगतीचा आढावा घेतला, असं समाज माध्यमावरच्या एका पोस्टमध्ये डॉक्टर जयशंकर यांनी सांगितलं.

परराष्ट्र मंत्री आणि त्यांच्या कॅनडाच्या समकक्ष मेलानी जोली यांच्यातल्या चर्चेत, द्विपक्षीय संबंधांच्या सद्यस्थितीवर लक्ष केंद्रित करण्यात आले.  दोन्ही नेत्यांनी जागतिक परिस्थितीवरही विचार विनिमय केला. परराष्ट्र व्यवहार मंत्री आणि युरोपियन युनियनचे परराष्ट्र व्यवहारांसाठीचे उच्च प्रतिनिधी जोसेप बोरेल यांनी सध्याच्या जागतिक परिस्थितीवर उभय दृष्टीकोनांची देवाणघेवाण केली. डॉक्टर जयशंकर आणि ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डेव्हिड कॅमेरून यांनीही भारत-यूके द्विपक्षीय सहकार्य तसंच जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवरही चर्चा केली.