अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अंदमान निकोबार बेटं सामरिक दृष्ट्या महत्वाची असून मोक्याच्या जागी असलेली ही बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा आहे, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल पोर्ट ब्लेअर इथं केलं. डॉक्टर बी आर आंबेडकर इन्स्टीट्युट ऑफ टेक्नोलॉजी इथं राष्ट्रपतींच्या सन्मानार्थ आयोजित समारंभात त्या बोलत होत्या.

अंदमान निकोबार बेटांचं नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करतं. ही बेटं अधिकाधिक पर्यटक स्नेही करण्यासाठी विविध पावलं उचलली जात आहेत. वीर सावरकर विमानतळ हा त्याचाच एक भाग असून पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना मिळेल, असा विश्वास मुर्मू यांनी व्यक्त केला. मात्र या  बेटांवरील पर्यावरण आणि परिसंस्था यांचं जतन करणं, आणि आदिवासींचा विकास  यावर राष्ट्रपतींनी भर दिला. राष्ट्रपतींचं काल अंदमान निकोबार बेटांच्या पाच दिवसांच्या भेटीसाठी पोर्ट ब्लेअर इथं आगमन झालं. सेल्युलर कारागृहाला भेट देऊन राष्ट्रपतींनी शहिदांना आदरांजली वाहिली.