जनधन खात्यांमध्ये २ लाख कोटी रुपये जमा झाल्याची मंत्री अनुराग ठाकूर यांची माहिती

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जन धन खात्यांमध्ये आत्तापर्यंत एकंदर दोन लाख कोटी रुपये जमा झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. दिल्लीत शुक्रवारी फेडरल बँकेच्या वार्षिक सरकारी आणि संस्थात्मक व्यवसाय संमेलनाचं उद्घाटन ठाकूर यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. बँकिंग क्षेत्र कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडलं असून सध्या हे क्षेत्र सर्वोच्च कामगिरी नोंदवत आहे. जनधन योजनेविषयी सुरुवातीला नकारात्मक दृष्टीकोन होता आता मात्र सरकार या योजनेला अभिमानानं प्रोत्साहन देऊ शकते असंही ठाकूर यावेळी म्हणाले.आता लहानात लहान देणी भीम यूपीआयवरून केली जातात. अशाच यशस्वी प्रयत्नांमुळे भारत आज सर्वोच्च पाचव्या अर्थव्यवस्थांमध्ये गणला जातो आणि लवकरच भारत जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने वाटचाल करतोय असंही ठाकूर यावेळी म्हणाले.