उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियानाअंतर्गत मुंबई विद्यापीठाच्या पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक विकासासाठी २० कोटी रुपयांचं अनुदान मंजूर झालं आहे. मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात एका कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरस्थ पद्धतीने अभियानाचा प्रारंभ झाला.

देशातल्या उच्च शैक्षणिक संस्थांचं बळकटीकरण, पायाभूत सुविधांचा विकास आणि नवीन शैक्षणिक उपक्रम राबविण्यासाठी पीएम उषा अंतर्गत देशातल्या विविध उच्च शैक्षणिक संस्थांना निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये राज्यातल्या एसएनडीटी विद्यापीठ, अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा समावेश आहे. या अभियानाअंतर्गत कल्याण आणि ठाणे संकुल तसंच कलिना इथं स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड अप्लाईड सायन्सेसमध्ये विविध योजना राबवण्यात येणार असल्याची माहिती मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांनी दिली. यामध्ये कलिना संकुलात मुलींचं नवीन वसतिगृह, इनक्युबेशन सेंटरचं आधुनिकीकरण आणि ठाणे संकुलात व्हॉली बॉल मैदान, टेनिस मैदान, सौरऊर्जा निर्मिती यंत्रणा, संरक्षक भिंत, प्रवेशद्वार आणि सुशोभीकरण, अंतर्गत रस्ते, रेनवॉटर हार्वेस्टिंग, आदी कामांचा समावेश आहे.

मुंबईच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेमध्ये रिसर्च पार्क इमारतीचं उद्घाटन तसंच शैक्षणिक आणि निवासी इमारतीचं भूमीपूजन प्रधानमंत्र्यांनी दूरस्थ पद्धतीने केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज जम्मूमध्ये ३२ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक जास्त निधीच्या प्रकल्पांचं उद्धघाटन केलं.