नोंदणीकृत हातमाग विणकरांना योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

 

पुणे : शास्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८ अंतर्गत राज्य शासनाने नोंदणीकृत व प्रमाणित हातमाग विणकरांसांठी विविध योजना जाहीर केल्या असून विणकरांना या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शास्वत वस्रोद्योग धोरणाअंतर्गत गणेश चतुर्थी निमित्त पाच पारंपारिक वस्त्रोद्योग क्षेत्रातील प्रमाणित व नोंदणीकृत विणकर महिलांसाठी १५ हजार तर पुरूषासाठी १० हजार रुपये उत्सव भत्ता, हातमाग विणकर कुटुंबांना प्रतिमाह २०० युनिटपर्यंत वीज सवलत योजना, पारंपरिक वस्रोद्योग विणकरांना बक्षीस योजना तसेच हातमाग विणकरांना केंद्र पुरस्कृत कच्चा माल पुरवठा योजनेतील धाग्यावर हातमाग विणकरांना अतिरिक्त अनुदान आदी योजनांचे लाभ देय आहेत.

या योजनांचे अर्ज प्रादेशिक उपआयुक्त, वस्रोद्योग कार्यालय, सोलापूर, जिल्हा महसुल कर्मचाऱ्यांची सह. पतसंस्था इमारत, जुने जिल्हाधिकारी कार्यालय आवार, सिद्धेश्वर पेठ सोलापूर येथे निशुल्क उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच rddtextiles2solapur@rediffmail.com या ई-मेल आयडीवर संपर्क साधल्यास मेलद्वारे अर्जाचे नमुने उपलब्ध करून देण्यात येतील.

अधिक माहितीसाठी विभागातील नोंदणीकृत व प्रमाणीत हातमाग विणकरांनी सोलापूर येथील प्रादेशिक कार्यालयाशी संपर्क साधून विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग चंद्रकांत टिकुळे यांनी केले आहे.