बांधकाम कामगारांना इस्राईलमध्ये रोजगाराची संधी – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा
• महेश आनंदा लोंढे
मुंबई : इस्राईलमध्ये रोजगाराच्या संधींसाठी कुशल बांधकाम कामगारांकडून अर्ज मागविण्याची कार्यवाही कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाकडून सुरू झाली आहे. इस्रायलमधील बांधकाम क्षेत्रात सुरक्षित वातावरणात आणि चांगल्या वातावरणात काम मिळावे यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करेल, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.
मंत्री श्री.लोढा म्हणाले की, केंद्र सरकारच्या नॅशनल स्किल डेव्हलपमेंट (NSDC) इंटरनॅशनल आणि राज्य शासनाच्या सहकार्याने बांधकाम कामगारांसाठी इस्राईलमध्ये काम करण्याची संधी मिळत आहे. शासनाकडून सर्वोतोपरी या बांधकाम कामगारांना मार्गदर्शन केले जाणार आहे. जिल्हास्तरावर जिल्हा कौशल्य, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे इच्छुकांनी संपर्क साधावा.
फ्रेमवर्क/ शटरिंग कारपेंटर, बार बेंडिंग मेसन, सिरेमिक टाइलिंग मेसन, प्लास्टरिंग मेसन इत्यादी विविध ट्रेडसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. निवडलेल्या व्यक्तीना इस्राईलमधील इमारत बांधकाम क्षेत्रात सुरक्षित वातावरणात आणि चांगल्या वातावरणात काम मिळावे यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे. या नोकरीमुळे प्रत्येक कामगाराला 1.4 लाख रुपयांपासून ते 2 लाखांपर्यंत दरमहा वेतन मिळेल. दरमहा 16,000 रुपये अतिरिक्त ठेव निधी ठेवावा लागेल.
या पदासाठी साठी 25 ते 45 वर्षे वयोगटातील अर्जदार नोकरीसाठी अर्ज करू शकतात. उमेदवाराने किमान 10 वी उत्तीर्ण केलेली असावी. कामगाराला किमान एक वर्ष ते कमाल पाच वर्षांच्या नोकरीसाठी अनिवार्य करारावर स्वाक्षरी करावी लागेल. तसेच त्यांना कामाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असावा. त्याचप्रमाणे इस्राईलमध्ये पूर्वीचा रोजगाराचा इतिहास नसावा. अर्जदार किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने यापूर्वी इस्राईलमध्ये काम केलेले नसावे.
अधिक माहितीसाठी https://rojgar.mahaswayam.gov.in/#/mic या संकेतस्थळावर भेट द्यावी आणि 8291662920 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाकडून करण्यात आले आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.