कोल्हापुरातल्या गावित भगिनींच्या फाशीच्या शिक्षेचं जन्मठेपेत रुपांतर करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कोल्हापुरातल्या गावित भगिनींच्या फाशीच्या शिक्षेचं रुपांतर मुंबई उच्च न्यायालयानं जन्मठेपेत केलं आहे. त्यांच्या दया याचिकेवर सरकारनं लवकर निर्णय न घेतल्यानं त्यांची शिक्षा जन्मठेपेत रुपांतरित केल्यांचं नितीन जमादार आणि सारंग कोतवाल यांच्या खंडपीठानं म्हटलं आहे. १३ मुलांचं अपहरण आणि त्यातल्या ५ जणांची हत्या केल्याच्या आरोपावरुन त्यांना २१ वर्षांपूर्वी उच्च न्यायालयानं फाशीची शिक्षा दिली होती. १६ वर्षांपूर्वी हा निर्णय योग्य असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिला होता. त्यानंतर सुमारे पावणे ८ वर्षांपूर्वी या भगिनींनी दयेचा अर्ज राज्य सरकारकडे केला होता. यावर अजूनपर्यंत निर्णय न दिल्यानं शिक्षा बदलण्यात आल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. या भगिनींना नोव्हेंबर १९९६ मध्ये अटक करण्यात आली होती. २५ वर्षांपेक्षा अधिक काळ तुरुंगात काढल्यामुळं सुटका करण्याची त्यांची विनंती मात्र न्यायालयानं फेटाळली आहे. त्यांनी केलेला गुन्हाी अतिशय गंभीर असल्यानं सुटका करता येणार नसल्याचं न्यायालयानं सांगितलं.