अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला निधीची कमतरता भासणार नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

 

नागपूर : समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय देत महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्याची सरकारची भूमिका आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना समाजातल्या गरजू लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिल्या. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी आज दिली.

नागपूर विधानभवनातील उपमुख्यमंत्री कार्यालयात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने तयार करण्यात आलेल्या बोधचिन्हाच्या अनावरणप्रसंगी उपमुख्यमंत्री श्री. पवार बोलत होते. यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार अतुल भातखळकर, प्रमोद हिंदुराव उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले की, समाजाच्या उन्नतीसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजना समाजाच्या गरजू लाभार्थ्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. एकही पात्र लाभार्थी योजनेपासून वंचित राहू नये, याची काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.