वाराणसीतल्या ३७ विकास प्रकल्पांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतामधे धर्माच्या आश्रयानेच अर्थव्यवस्था आणि कला- संस्कृती बहरली असून आजही धार्मिक तीर्थक्षेत्रांच्या पायाभूत विकासाकरता सरकार कटिबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. वाराणसीच्या स्वर्वेद महामंदिराचं उद्घाटन केल्यानंतर आज ते बोलत होते. या मंदिराची तसंच वाराणसीतल्या इतर पुरातन मंदिरांची उदाहरणं त्यांनी दिली. अयोध्येचं राम मंदिर आणखी काही आठवड्यात पूर्ण होईल असं त्यांनी सांगितलं.  पाणी वाचवा, स्वच्छता राखा, स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन द्या, पर्यटनासाठी परदेशात जाण्याआधी आपल्या देशातल्या ठिकाणांना प्राधान्य द्या, नैसर्गिक शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना पाठबळ द्या, पौष्टिक भरडधान्यांना रोजच्या आहारात स्थान द्या, योग आणि खेळाच्या आधारे तंदुरुस्ती राखा, आणि दरसाल किमान एका गरीब कुटुंबाला आर्थिक मदत करा असे ९ संकल्प करण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी आपल्या भाषणात केलं. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.

वाराणसी आणि परिसरातल्या ३७ विविध विकासप्रकल्पांचं उद्घाटन आज प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते होत आहे. भावपूर मालवाहतूक मार्गिका प्रकल्प, वाराणसी नवी दिल्ली वंदे भारत रेल्वेचा प्रारंभ, वाराणसीतल्या पर्यटन स्थळांची सविस्तर माहिती देणाऱ्या आणि या सर्व ठिकाणांसाठी  एकत्रित प्लॅटफॉर्म तिकीट उपलब्ध असलेल्या संकेत स्थळाचा प्रारंभ यांचा त्यात समावेश आहे.