विमान कंपन्यांची कामगिरी तसंच त्यांच्याकडून ग्राहकांना देण्यात येणारी सेवा यांच्याशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतातील एरोस्पेस उत्पादनाची पुरवठा साखळी विस्तारण्यास मदत व्हावी यासाठी सरकारच्या प्रत्येक संबंधित विभागाकडून त्यादृष्टीनं आवश्यक असलेल्या गोष्टींची रूपरेषा देणारी सहयोगी योजना सादर करावी, अशी सूचना केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी एरोस्पेस उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांना केली आहे. एरोस्पेस मॅन्युफॅक्चरर्स आणि मेंटेनन्स, रिपेअर आणि ओव्हरहॉल अर्थात MROsच्या सल्लागार गटाच्या बैठकीत शिंदे यांनी ही सूचना केली. विमान कंपन्यांची कामगिरी तसंच त्यांच्याकडून ग्राहकांना देण्यात येणारी सेवा यांच्याशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्याच्या उद्देशानं ही बैठक बोलावण्यात आली होती.

भारताला विमान वाहतुकीचं जागतिक केंद्र म्हणून प्रस्थापित करण्यासाठी तसंच जागतिक स्तरावर स्पर्धात्मक विमान वाहतूक परिसंस्था निर्माण करण्याची मंत्रालयाची वचनबद्धता ज्योतिरादित्य शिंदे यांनी अधोरेखित केली. अयोध्या आणि सुरत यासारख्या द्वितीय आणि तृतीय श्रेणीतल्या शहरांमधल्या विमानतळावरची वाहतूक अधिक चांगली, वेळेवर होईल याची विमान कंपन्यांनी दक्षता घ्यावी असंही त्यांनी यावेळी सांगितलं.