राज्यातील स्टार्टअप्सना आवश्यक सर्व सहकार्य करणार – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

 

मुंबई : राज्यातील स्टार्टअपला आवश्यक असलेले सर्व सहकार्य राज्य शासनाकडून केले जाईल. आपल्या राज्याला स्टार्टअपमध्ये देशात प्रथम क्रमांकावर कायम ठेवण्यास सर्वतोपरी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

‘विचार कौशल्य’ म्हणजेच ‘थिंकिंग स्किल्स’ चा विकास व नवकल्पनांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाने २० महाविद्यालये व संस्था यांच्याबरोबर ‘प्री-इनक्युबेशन सेन्टर्स’ स्थापन केले आहे. मुंबई येथील लाला लजपतराय वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयातील केंद्रांच्या उद्घाटन प्रसंगी  कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे अपर मुख्य सचिव  आशिषकुमार सिंह, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे आयुक्त डॉ. एन. रामास्वामी, कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.अपूर्वा पालकर यांच्यासह सुमारे ७५० विद्यार्थी उपस्थित होते. यामध्ये कौशल्य विद्यापीठाच्या विद्यार्थांबरोबर लाला लजपतराय महाविद्यालय, चेतना व्यवस्थापन संस्था, आर.जे. महाविद्यालय, एन. एल. दालमिया व्यवस्थापन संस्था, गुरु नानक खालसा महाविद्यालय, सेंट झेवियर महाविद्यालय या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा समावेश होता.

प्रथम टप्प्यात  विद्यापीठ व महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी ३ हजार विद्यार्थ्यांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचवेल. नवकल्पनांची स्पर्धा १८ डिसेंबर, २०२३ ते २६ जानेवारी, २०२४ दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. यातून १० संघ ‘बूट कॅम्प’ साठी निवडण्यात येतील. नवकल्पनांचे अंतिम सादरीकरण फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या समवेत अंतिम संघाना बक्षीस देणार असून प्रथम क्रमांकास रु. ४ लाख, द्वितीय क्रमांकास रु. ३ लाख, आणि तृतीय क्रमांकास रु. १ लाख/- इतके रोख बक्षीस जाहीर केले आहे.

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा या उपक्रमामधून २००० पेक्षा जास्त नवकल्पना साकारण्याचा उद्देश आहे. नवोन्मेषाच्या संस्कृतीमध्ये वाढ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाकडून सर्व सहभागी महाविद्यालयांमधील प्राध्यापकांसाठी कौशल्ये विकसित करण्यासाठी ‘शिक्षक विकास कार्यक्रम’ आयोजित करण्यात येणार आहे. विद्यापीठ एक वर्षाच्या कालावधीत किमान १०० प्राध्यापकांना महाविद्यालयीन स्तरावरील नवकल्पनांचे मुल्यांकन तसेच ‘प्री-इनक्युबेशन सेन्टर्स’ चे कामकाज करू शकतील यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

यामध्ये महत्त्वाच्या उपक्रमांचा समावेश असून जागरूकता कार्यक्रम असा आहे. :  १६ व १७ डिसेंबर २०२३ – नवकल्पना स्पर्धा – महाविद्यालय स्तर, १७ डिसेंबर, २०२३ ते २६ जानेवारी २०२४, स्पर्धेचा निकाल (प्रथम १०)- २७ जानेवारी, २०२४, बूट कॅम्प – २८ जानेवारी, २०२४ ते ०२ फेब्रुवारी २०२४, अंतिम सादरीकरण- ०५ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी, २०२४ या कालावधीत करण्यात येणार आहे.

Popular posts
लाल समुद्र आणि एडनच्या आखातातल्या जहाजांवरचे हल्ले थांबवण्याचं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचं हौती दहशतवाद्यांना आवाहन
Image
राज्यातील कामगारांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती - कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती
Image
भारताला रशियाकडून एस ४०० क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्यावर निर्बंध न लादण्याचा अमेरिकेचा निर्णय
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image