श्रीलंकेतल्या भारतीय वंशाच्या तामिळी नागरिकांना भारताचा कायम आधार मिळेल - अर्थमंत्री

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) श्रीलंकेतल्या भारतीय वंशाच्या तामिळी नागरिकांना भारताचा कायम आधार मिळेल, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या काल कोलंबो मध्ये बोलत होत्या. अर्थमंत्री सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर असून, श्रीलंकेत भारतीय तामिळी लोकांच्या आगमनाच्या द्विशताब्दी वर्षपूर्ती निमित्त आयोजित कार्यक्रमात त्या काल सहभागी झाल्या.

आपल्या दौऱ्यात त्यांनी भारतीय गृहनिर्माण प्रकल्पा अंतर्गत बांधल्या जात असलेल्या १०,००० घरांची दूरदृश्य प्रणाली द्वारे पायाभरणी केली. आणि भारताच्या सहकार्यानं हाती घेण्यात आलेल्या  विविध मानवतावादी प्रकल्पांचं उदघाटनही  केलं. दोन्ही देशांमधल्या दीर्घकालीन  संबंधांचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला. त्यानंतर अर्थमंत्र्यांनी भारत श्रीलंका व्यापार परिषदेला  संबोधित केलं, आणि ऊर्जा क्षेत्राच्या विकासासाठी अधिक प्रयत्न करण्याचं आवाहन केले. परकीय चलन वाचवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये समान चलन वापराची मजबूत प्रादेशिक व्यवस्था निर्माण करण्याची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं.

अर्थमंत्र्यांनी श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांचीही भेट घेतली आणि आर्थिक आणि व्यावसायिक क्षेत्रातल्या दोन्ही देशांच्या  संयुक्त उपक्रमांवर चर्चा केली. विक्रमसिंघे यांनी यावेळी पर्यटन, शाश्वतता, कृषी आधुनिकीकरण आणि डिजिटायझेशनच्या क्षेत्रात  भारताबरोबरच्या सहकार्याचं  स्वागत  केलं.