केंद्र सरकारच्या योजनांच्या माहितीसाठी केंद्रीय संचार ब्युरोचे प्रदर्शन उपयुक्त - प्रशांत ठाकूर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरोमार्फत आयोजित 'भारत सरकार : 9 वर्षे सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची आणि आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष' या विषयावरील मल्टीमीडिया प्रदर्शनाचे उद्घाटन आज पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले.

नवी मुंबईतील खारघर परिसरात लिटल वर्ल्ड मॉल येथे हे प्रदर्शन भरवण्यात आले असून 7, 8 आणि 9 नोव्हेंबरदरम्यान सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. केंद्र सरकारमार्फत गेल्या 9 वर्षांत राबवण्यात आलेल्या विविध कल्याणकारी योजना आणि उपक्रम यांच्याबाबत माहिती चित्रे आणि डिजिटल स्वरुपात दाखवण्यात आली आहे.

प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी नवी मुंबई टपाल कार्यालयाचे वरीष्ठ अधीक्षक नितीन येवला नायब तहसीलदार संजय भालेराव, पनवेलच्या बालविकास प्रकल्प अधिकारी सुहिता ओव्हाळ, उद्योजक कांतीभाई पटेल, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पाटील, अविनाश कोळी, केंद्रीय संचार ब्युरोचे पुणे विभागाचे उपसंचालक निखिल देशमुख, प्रसिद्धी अधिकारी हर्षल आकुडे, प्रसिद्धी सहायक पी. कुमार यांच्यासह पनवेल परिसरातील माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्वप्रथम आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते फित कापून तसेच दीपप्रज्वलन करून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ठाणे येथील लोककलावंत बहुद्देशीय संस्थेच्या कलाकारांनी महाराष्ट्र राज्यगीताचे सादरीकरण केले. यानंतर प्रशांत ठाकूर यांनी संपूर्ण प्रदर्शनात फेरफटका मारून त्याचा आढावा घेतला.

आपल्या भाषणात बोलताना प्रशांत ठाकूर यांनी केंद्रीय संचार ब्युरोच्या प्रदर्शनाचे कौतुक केले. ते म्हणाले की गेल्या 9 वर्षांच्या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने अनेक लोकोपयोगी आणि कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा लाभ मिळवून अनेक नागरिकांच्या जीवनात आशेचे किरण निर्माण झाले आहेत.

सदर योजनांचा अधिकाधिक लोकांना लाभ घेता यावा, यासाठी केंद्रीय संचार ब्युरोच्या मल्टीमीडिया प्रदर्शनाची गरज आहे. असे प्रदर्शन सर्वत्र सातत्याने भरवण्यात यावेत. याच्या मदतीने नागरिकांमध्ये शासकीय योजनांबाबत जनजागृती होऊन त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडतील, असे मत यावेळी प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केले.

दरम्यान, ठाकूर यांच्या हस्ते परिसरातील आयुष्मान भारत योजना लाभार्थी आणि प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांना कार्डचे वितरण करण्यात आले.

यानंतर, प्रदर्शनात शासकीय योजनांसोबतच भारतीय टपाल विभागांच्या विविध योजना आणि आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षाच्या निमित्ताने एकात्मिक बालविकास सेवा योजनेमार्फत 'श्री अन्न रेसिपी'संदर्भात सविस्तर माहितीही देण्यात आली. भरडधान्यांचा वापर करून बनवण्यात आलेल्या चवदार पदार्थांचा आस्वाद यावेळी उपस्थितांनी घेतला. प्रदर्शनस्थळी लावण्यात आलेल्या 'स्वच्छ भारत अभियाना'संदर्भातील सेल्फी पॉईंटला प्रेक्षकांचा विशेष प्रतिसाद मिळाला.

यासोबतच प्रदर्शनस्थळी पनवेल तहसील कार्यालयामार्फत मतदार नोंदणी शिबीरही लावण्यात आले असून परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.