समाज कल्याण विभागामार्फत 'वॉक फॉर संविधान' चे उत्साहात आयोजन

 

पुणे : सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय पुणे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थाम बार्टी व पुणे शहरातील विविध सामाजिक संघटनांमार्फत संविधान दिनानिमित्त 'वॉक फॉर संविधान' रॅलीचे रविवारी (दि. २६) उत्साहात आयोजन करण्यात आले.

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्थापन केलेल्या‍ भारतातील पहिली मुलींची शाळा ही ऐतिहासिक वास्तू भिडेवाडा येथून संविधान रॅलीची सुरूवात करण्यात आली. यावेळी केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाच्या उपसचिव श्रीमती क्रांती खोब्रागडे, समाज कल्याण सहायक आयुक्त विशाल लोंढे, उपजिल्हाधिकारी तथा बार्टीच्या विभागप्रमुख श्रीमती स्ने्हल भोसले, राज्य शासनाचे माजी सचिव ओ.डी.तायडे आदी उपस्थित होते.

यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. रॅलीचा भिडेवाडा येथून प्रारंभ होऊन लाल महाल, फडके हौद, दारूवाला पूल, १५ ऑगस्ट चौक, जूनी जिल्हा परिषद मार्गे डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान ससून रूग्णायलयासमोर येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून समारोप करण्यात आला.

या रॅलीमध्ये समाज कल्याण विभागाअंतर्गत कार्यरत वसतिगृहे, समाजकार्य महाविद्यालये, पुणे शहरातील महाविद्यालयांमधील विद्यार्थी, सामाजिक संस्था, ज्येष्ठ नागरिक संघटनांचे सदस्य, तृतीयपंथीयांसाठी कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्था व तृतीयपंथी व्यक्ती आदींनी सहभाग घेतला.

यावेळी यशदाचे संशोधन अधिकारी बबन जोगदंड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा विभागप्रमुख बार्टी श्रीमती शुभांगी पाटील, विशेष अधिकारी समाज कल्याण मल्लिनाथ हरसुरे, प्रकल्प अधिकारी बार्टी शितल बंडगर, सतीश गायकवाड, शहरातील महाविद्यालयाचे प्राचार्य उपस्थित होते.