शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी करून अहवाल पाठवण्याच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी करून अहवाल पाठवण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

राज्यात पावसामुळे नाशिकमध्ये दोन आणि हिंगोलीमध्ये एका शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. आज पहाटेही राज्यातल्या अनेक भागात पावसानं हजेरी लावली. मुंबई शहर, उपनगरासह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी आज पहाटे हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळला.

राज्यात अनेक जिल्ह्यांत काल रात्रीपासून अवकाळी पाऊस पडत आहे. नांदेड, हिंगोली, वाशिम, अमरावती, अकोल्यात रात्रीपासून जोरदार पावसानं हजेरी लावली होती. विजेच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस कोसळला. नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले. निफाड तालुक्यातील कसबे सुकेणे परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने द्राक्षबागा पडल्या आहेत.