आसाममधील महत्वाच्या ठिकाणांचा दौरा : महाराष्ट्राच्या पत्रकारांची एम्स गुवाहाटी आणि सुआलकुची रेशीम केंद्राला भेट

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) महाराष्ट्रातील 13 नामवंत पत्रकार सध्या आसामच्या 3 दिवसीय अधिकृत दौऱ्यावर असून राज्याच्या बहुआयामी क्षेत्राचा आणि तेथील नयनरम्य  पर्यटन स्थळांचा अनुभव घेत आहेत.  आसामच्या विविध विभागांच्या अंतर्गत चालणाऱ्या कामकाजाची माहिती मिळवणे हा या दौऱ्याचा  मुख्य उद्देश आहे.  आसाममधील  दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी   प्रवासाला सुरुवात करताना,पत्रकारांच्या  शिष्टमंडळाला  गुवाहाटी येथील प्रतिष्ठित अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेला (एम्स)  भेट देण्याची संधी मिळाली.

एम्स गुवाहाटी येथे पत्रकारांचे स्वागत झाले आणि पत्रकारांच्या शिष्टमंडळाचे संस्थेच्या अधिकार्‍यांसोबत फलदायी, संवादी सत्र झाले.  या सत्रादरम्यान,प्रा.  अशोक पुराणिक, कार्यकारी संचालक, एम्स , यांनी आसाम आणि संपूर्ण ईशान्येकडील प्रदेशातील आरोग्य सेवा क्षेत्रात एम्सच्या भरीव योगदानाबाबत बहुमूल्य माहिती दिली.

राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अभियान संचालक  डॉ एम एस लक्ष्मीप्रिया यांनी राज्याच्या आरोग्य विभागाचा  विस्तृत आढावा सादर केला आणि विभागाने साध्य केलेले  प्रमुख टप्पे अधोरेखित केले. या सत्रात  राज्यभरातील आरोग्य सेवा सुधारण्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम ) आसामच्या, उल्लेखनीय कामगिरीवर प्रकाश टाकण्यात आला. पत्रकारांनी यावेळी आरोग्य सेवा उत्सव, विनामूल्य औषध सेवा, विनामूल्य  निदान सेवा, 'बडी मदर कार्यक्रम(स्तनदा मातेकडून गर्भवती महिलेला मार्गदर्शन ) , नवीन हायब्रीड मॉडेल, प्रयोगशाळा सेवा अशा विविध उपक्रमांची माहिती घेतली.

माध्यम शिक्षण विभागाचे  संचालक डॉ अनुप कुमार बर्मन यांनी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे सादरीकरण केले आणि सध्याचे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन परिदृश्य, आगामी प्रकल्प आणि विभागीय योजनांची माहिती दिली.

या  भेटीदरम्यान, पत्रकारांसाठी  एम्स गुवाहाटीचा विशेष दौरा आखण्यात आला होता. या दौऱ्यात  त्यांना संस्थेच्या अत्याधुनिक सुविधा आणि या  प्रदेशाच्या आरोग्यसेवा परिदृश्यामधील  एम्सची  निर्णायक भूमिका याबद्दल प्रत्यक्ष सूक्ष्म दृष्टिकोनातून माहिती देण्यात आली.

तत्पूर्वी आज, महाराष्ट्र पत्रकार चमूने आसाममध्ये पारंपारिक रेशीम कापड तयार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या प्रसिद्ध हातमाग  तंत्राबद्दल जाणून घेण्यासाठी  सुआलकुचीला भेट दिली. ईशान्य हस्तकला आणि हातमाग विकास महामंडळ मर्यादित ( एनईएचएचडीसी ), आसामने सुआलकुचीच्या रेशीम वस्त्र केंद्राचा हा दौरा आयोजित केला होता.

या दौऱ्याचा आणखी एक दिवस शिल्लक असून पत्रकरांचे हे शिष्टमंडळ  आसामची अनोखी संस्कृती, उपक्रम आणि नयनरम्य ठिकाणांना भेट देतील. यामुळे  महाराष्ट्र आणि आसाममधील बंध आणखी दृढ होतील.