9 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव - 2024 च्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विज्ञान सचिवांची बैठक
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): स्टार्टअप्स आणि संभाव्य उद्योजकांसाठी मोदी सरकारने सादर केलेल्या तरतुदी सक्षम करणार्या विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाबाबत जागरूकता निर्माण करण्याकरिता देशव्यापी सार्वजनिक संपर्क मोहिमेचा आराखडा तयार करण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी देशभरातील वैज्ञानिक संस्था आणि संशोधन संस्थांना केले आहे.
केंद्रीय मंत्री म्हणाले, चांद्रयान-3 चंद्रावर उतरल्यानंतर भारताच्या अंतराळ संशोधन प्रकल्पांमध्ये लोकांना मोठ्या प्रमाणावर रुची निर्माण झाली आहे आणि ही उत्कंठा शाश्वत ठेवण्याची गरज आहे.
“ही मोहीम पीएम मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारच्या नऊ वर्षांपेक्षा जास्त काळातील डीएसटी, सीएसआयआर, डीबीटी, इस्रो, डीआरडीओ आणि इतर वैज्ञानिक विभागांद्वारे केलेल्या अग्रगण्य कामगिरीबद्दल जनजागृती करण्याबरोबरच तरुणांना यात योगदान देण्यासाठी आणि या रोमांचक प्रवासाचा भाग होण्यासाठी प्रेरित करेल” असे त्यांनी सांगितले.
केंद्रीय (स्वतंत्र प्रभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री; पीएमओ, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत सर्व विज्ञान सचिवांची बैठक झाली. या बैठकीला भारत सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार (पीएसए) प्राध्यापक अजय कुमार सूद; डीएसटीचे सचिव प्रा.अभय करंदीकर; सीएसआयआरच्या सचिव डॉ. (श्रीमती) एन. कलैसेल्वी; डीबीटीचे सचिव डॉ. राजेश एस. गोखले; अंतराळ विभागाचे सचिव आणि इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ; अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि अणुऊर्जा विभागाचे सचिव डॉ. अजितकुमार मोहंती यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सीएसआयआर -एनआयएसपीआर च्या 1 जानेवारी 2023 ते 24 सप्टेंबर 2023 दरम्यान 37 सीएसआयआर प्रयोगशाळा/संस्थांनी आयोजित केलेल्या 'वन वीक वन लॅब' विद्यार्थी संपर्क कार्यक्रमाचे कौतुक करताना डॉ जितेंद्र सिंह यांनी शालेय विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यपूर्ण क्षमता वाढवण्याचे आवाहन केले.
“भारताला 5 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट बनवण्यात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताचे ध्येय पूर्ण करण्यात नवोन्मेषी शिक्षण योगदान देईल,” असे ते म्हणाले.
वैज्ञानिक वृत्ती निर्माण करण्यात इन्स्पायर योजना सहाय्यकारी ठरत आहे. दरवर्षी पुरस्कारांसाठी स्पर्धा करणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांची संख्याही वाढत आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षाचे औचित्य साधून नोव्हेंबर 2021 मध्ये युवा नवोन्मेषकांसाठी पहिला मार्गदर्शन कार्यक्रम सुरू करण्यात आला होता, असे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्र्यांनी सांगितले.
इनस्पायर पुरस्कार – मानक हा केन्द्र सरकारचा पथदर्शक कार्यक्रम आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (डीएसटी), केन्द्र सरकार आणि राष्ट्रीय नवोन्मेष संस्थेच्या (एनआयएफ) - संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम राबवला जातो. इन्स्पायर योजना, अनेक घटकांसह 10-32 वयोगटातील विद्यार्थ्यांच्या आवश्यकता पूर्ण करते. आतापर्यंत, 1.3 लाखाहून अधिक उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांना नैसर्गिक आणि मूलभूत विज्ञानात कारकीर्द घडवण्यासाठी इन्स्पायर शिष्यवृत्ती देण्यात आली आहे.
विविध विद्यापीठे/संस्था आणि इतर शैक्षणिक संस्थांमधील संशोधन कार्यांसाठी, संशोधन आणि विकास उपकरणे वाढवण्यासाठी/सुविधा देण्यासाठी तसेच उद्योग-शैक्षणिक संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी FIST, PURSE, SAIF इत्यादी विविध पायाभूत सुविधांशी संबंधित योजनांना विज्ञान तंत्रज्ञान विभाग पाठबळ देते असे डॉ जितेंद्र सिंह म्हणाले.
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार देशातील वैज्ञानिक संशोधन आणि नवोन्मेषाच्या प्रयत्नांना बळ देऊन लोकांमध्ये, विशेषतः तरुणांमध्ये वैज्ञानिक वृत्ती वाढवण्यासाठी अनेक पावले उचलत आहे असे डॉ जितेंद्र सिंह म्हणाले. ही एक राष्ट्रव्यापी योजना आहे. देशातील प्रत्येक जिल्ह्यात जैवतंत्रज्ञान विभागाच्या पाठबळाद्वारे स्टार महाविद्यालय उभारणी या अंतर्गत अपेक्षित आहे.
डीबीटी स्टार महाविद्यालय योजनेंतर्गत देशभरातील 1.5 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची एकूण 278 पदवीपूर्व महाविद्यालयांना पाठबळ देण्यात आले आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 55 महाविद्यालये आणि आकांक्षी जिल्ह्यातील 15 महाविद्यालयांचा समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत आता नवोन्मेषी तंत्रज्ञानात जगाचे नेतृत्व करत आहे. आपण हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्याच्या आणि 2070 पर्यंत निव्वळ शून्य गाठण्याच्या आपल्या लक्ष्यावर मार्गस्थ आहोत असे डॉ जितेंद्र सिंह म्हणाले.
फरीदाबाद मधील एनसीआर जैवतंत्रज्ञान विज्ञान संकुल येथे 17-20 जानेवारी, 2024 दरम्यान आयोजित 9व्या भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (IISF) - 2024 च्या तयारीचा सिंह यांनी यावेळी आढावा घेतला.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.