मराठा समाजाला अर्धवट आरक्षण दिलं जात असून ते स्वीकारणार नाही,अशी मनोज जरांगे यांची भूमिका

 


मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा समाजाला अर्धवट आरक्षण दिलं जात असून ते स्वीकारणार नाही, असं या मागणीसाठी उपोषण करत असलेले मनोज जरांगे यांनी आज पुन्हा स्पष्ट केलं. ताबडतोब विधिमंडळाचं अधिवेशन बोलावून मराठा समाजाला हक्काचं आरक्षण द्या, अन्यथा पुन्हा पाणी बंद करण्याचा इशारा त्यांनी दिला. गुन्हे दाखल करण्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर त्यांनी टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी जरांगे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. छत्रपती शाहू महाराज यांनी उपोषणस्थळी जाऊन जरांगे यांच्याशी चर्चा केली. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकांचा आक्रमक पवित्रा आजही कायम राहिला.  जालना जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलं जात आहे. राजूर, राणीऊंचेगाव, हसनाबाद इथं रस्त्यावर टायर जाळून चक्काजाम आंदोलन झालं तर घनसावंगी इथं जमावानं पंचायत समिती कार्यालय पेटवून दिलं. त्यामुळे महत्त्वाची कागदपत्रं जळून खाक झाली. नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांच्या संपर्क कार्यालयाला टाळं ठोकून ठिय्या आंदोलन करण्यात आले. तर येवला इथं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रतिमांची मोडतोड करण्यात आली.बुलढाणा जिल्ह्यात नागपूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर देऊळगाव मही इथं रस्ता  रोको करण्यात आलं. बीड जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी  जिल्ह्यातील सर्व आस्थापना बंद ठेवल्या आहेत. उस्मानाबाद जिल्ह्याच्या विविध भागात धरणं, आंदोलनं, रस्तारोको तसंच उपोषणं सुरू आहेत. जिल्हादंडाधिकाऱ्यांनी संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत. तुळजापूर तालुक्यात मौजे इटकळ आणि बाभळगाव इथं राष्ट्रीय महामार्गांवर रास्ता रोको आंदोलन झालं.हिंगोली जिल्ह्यात नांदेड हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर डोंगरकडा फाटा इथं रस्ता रोको आंदोलन झालं. नांदेड जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा म्हणून औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे.