शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर विधानसभा अध्यक्षांसमोर आता २ नोव्हेंबरला सुनावणी होणार

 


मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर विधानसभा अध्यक्षांसमोर आता २ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. नवे पुरावे सादर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे वकील अनिल साखरे आणि अनिल सिंग यांनी १४ दिवसांच्या कालावधीची मागणी केली. साक्षी पुरावे तपासायला हवेत यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निकालांची उदाहरणं दिली. उद्धव ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी त्याला आक्षेप घेतला. जाहीरपणे झालेल्या आणि कोणीही आक्षेप न घेतलेल्या गोष्टींचे साक्षीपुरावे तपासण्याची गरज नसल्याचा दावा त्यांनी केला. शिवसेनेची घटना, शिवसेनेची राजकीय पक्ष आणि संसदीय पक्षरचना, निवडणूक आयोगाकडे झालेला पत्रव्यवहार आदी बाबींसाठी कागदोपत्री तपशील उपलब्ध आहे. त्याआधारे मूळ पक्ष कोणाचा, या मुद्द्याचा निर्णय व्हावा, असा युक्तिवाद ठाकरे गटानं केला.